मोरबे येथील धरणातील जलसाठा दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने पालिका प्रशासनाने सुरू केलेली २५ टक्के पाणीकपात अपरिहार्य आहे. मात्र पाणी बचतीची फारशी सवय नसलेले नवी मुंबईकर या पहिल्याच पाणीकपातीने बिथरले आहेत. त्यात शिवसेनेसारख्या पक्षाने समजूतदारपणा दाखविण्याऐवजी मटका मोर्चा काढल्याने पालिका प्रशासन नाराज झाले आहे.
स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असल्याने जलसंपन्न झालेल्या नवी मुंबईला आता पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. जून-जुलैपर्यंत पाणी पुरवण्यासाठी प्रशासनाने २५ टक्के पाणीकपातीला सुरुवात केली आहे. गतवर्षी मोरबे धरण क्षेत्रात ३ हजार १४३ मिमी पाऊस पडल्याने पाणीटंचाईचे संकट शहरावर ओढवले नाही. मात्र या वर्षी हाच पाऊस केवळ २२०० मिमी. पडला असल्याने केवळ ८० दशलक्ष पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीकपात न केल्यास हा साठा मार्चपर्यंतच पुरेल. त्यानंतरची स्थिती अंत्यत दयनीय होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने टप्प्याटप्प्याने २५ टक्के पाणीकपात सुरू केली आहे.