सिडको वसाहतींमध्ये आठवडा बाजार ही नवीन संकल्पना रुजू लागली आहे. ग्रामीण भागात पूर्वी विविध वस्तू एकाच ठिकाणी मिळत नसल्याने आठवडा बाजाराची संकल्पना रुजली. परंतु सिडको वसाहती स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहात असताना येथील व्यापाऱ्यांना रोज बेकायदा विक्रेत्यांशी सामना करावा लागत आहे.
या बाजारातील वस्तूंचा दर्जा निकृष्ट असतोच शिवाय हे विक्रेते कोणताही कर न भरता येथे व्यापार करतात. पनवेल तालुक्यामधील कळंबोली, खारघर, कामोठे, नवीन पनवेल व खांदा कॉलनी, नावडे, तळोजा या सिडको वसाहतींमध्ये हा आठवडा बाजार भरत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने रस्ते अडविणाऱ्या धार्मिक उत्सव मंडळांवर कारवाई होते, मात्र पदपथ अडवणाऱ्या या आठवडा बाजारावर कारवाई कशी होत नाही, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.
मोकळा रस्ता आणि मैदाने ही आठवडा बाजाराची ठिकाणे झालीत. प्रत्येक वसाहतीला आठवडय़ाचा एक वार या संकल्पनेवर हा बाजार भरवला जातो. मात्र या बाजाराला त्या वसाहतीमधील गावगुंड आणि स्थानिक पोलिसांचा आशीर्वाद असल्याचे उघड आहे. मुंबईतील गोवंडी, मानखुर्द येथून विक्रीसाठी सामान आणायचे, दुपारपासून ते रात्रीपर्यंत होईल तेवढी विक्री करायची आणि निघून जायचे, असा हा व्यवहार आहे. सध्या या बाजाराने रस्त्यावरही बस्तान बसवल्याने रस्त्यांचा श्वास कोंडला आहे.
सिडको वसाहतींमध्ये या आठवडा बाजारासाठी काही ठिकाणी राखीव भूखंड आहेत. मात्र तेथे कोणताही बाजार भरवला जात नाही. सिडकोच्या अतिक्रमणविरोधी विभागाकडूनही या बाजारावर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.