पनवेल : खारघर वसाहतीमध्ये राहणाऱ्या २५ वर्षांच्या एका तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब वाशीमध्ये घडली आहे. याबाबत पीडित तरुणीने खारघर पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये मागील दोन वर्षांत वाशीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने हा अत्याचार केल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी याबाबत बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा या व्यक्तीविरोधात नोंदविला आहे.

अत्याचार करणाऱ्या व्यक्तीने मोठ्या पदावर काम करत असल्याचे भासवून या पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमात अडकवले. पीडितेचा विश्वास संपादन केल्यावर नवी मुंबईतील सानपाडा येथील हॉटेल स्काय स्वीटमध्ये वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याचे पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा – बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल

हेही वाचा – कळंबोलीत चार किलो गांजासह एकाला अटक

धक्कादायक बाब म्हणजे अत्याचार करताना त्याने पीडितेचे चित्रण केले. पीडितेने इतर कोणाशी लग्न केल्यास संबंधित चित्रण समाजमाध्यमांवर प्रसारीत करणे, जो कोणी पीडितेशी लग्न करेल त्यालासुद्धा पाठविणे अशी धमकी अत्याचार करणाऱ्याने दिली. त्यामुळे पीडितेचे लग्न मोडले. अखेर बुधवारी खारघर पोलिसांत पीडितेने संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविला.