scorecardresearch

पोलिसांच्या समन्वयामुळे बलात्कार प्रकरणातील आरोपीला ८ तासांत अटक

गुजरात सूरत येथून मित्रासोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या शिक्षिकेवर बलात्कार करून पळून जाणाऱ्या दुकलीला पोलिसांनी आठ तासांत अटक केली.

पनवेल : गुजरात सूरत येथून मित्रासोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या शिक्षिकेवर बलात्कार करून पळून जाणाऱ्या दुकलीला पोलिसांनी आठ तासांत अटक केली. ही घटना सोमवारी पहाटे सहा वाजता घोट गावात घडली होती. तळोजा पोलिसांनी तातडीने संशयित आरोपींचे छायाचित्र नवी मुंबई क्राइम ब्रँच युनिट २ च्या पथकाला दिल्याने आरोपींना धावत्या लोकलमधून अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले. तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी याप्रकरणी अयुब खान (२२) व शहाबाज अली (२०) यांना अटक केल्याची माहिती दिली. तळोजा पोलिसांनी महिलेने पहाटेच तक्रार दिल्यावर तातडीने आरोपींच्या मित्रांच्या मदतीने त्यांची छायाचित्रे व मोबाइल क्रमांक मिळवून नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथक २ चे प्रमुख गिरीधर गोरे यांना दिले.

पोलीस निरीक्षक गोरे यांच्या पथकाने खांदेश्वर ते टिळकनगर या हार्बर मार्गावरील लोकलमधून अयुब व शहाबाजला ताब्यात घेतले. पोलीसांच्या समन्वयामुळे हा गुन्हा उघडकीस आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी दिली. या प्रकरणातील पीडिता ही सूरत येथे राहणारी असून तिची इन्स्टाग्रामवरून अयुबशी ओळख झाली. अयुब हा सायन येथे इलेक्ट्रिशनचे काम करतो. अयूबने पीडितेला वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबईला बोलावल्यावर तिला तळोजा येथे अयुबचा मित्र शहाबाज राहत असलेल्या घोट येथील गोंधळी यांच्या चाळीतील खोलीत घेऊन गेला. तेथे पीडितेला बिअर पिण्यास देऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच शहाबाजने पीडितेचा विनयभंग केला. याबाबत पीडितेने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यावर तळोजा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करून परप्रांतीय कामगारांची शोधाशोध सुरू केली. अयुब व शहाबाज हे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Accused rape case arrested police coordination ysh