उरण तालुक्यातील वाढत्या औद्योगिकीकरणात रासायनिक पदार्थाच्या वापरात वाढ झाल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या प्रकृतीवर होत असून कॅन्सरसारखे असाध्य आजार जडण्याची भीती व्यक्त होत आहे. दुसरीकडे रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे अनेकांना श्वसनाचे आजार जडू लागले आहेत. या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही कारवाई अथवा उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे.
उरणमध्ये मुंबईच्या समुद्रातील तेल विहिरीवर आधारित ओएनजीसीचा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. या प्रकल्पात नाफ्तासारख्या अतिज्वलनशील व उग्र वासाच्या पदार्थाची साठवणूक केली जाते. त्यामुळे अनेक वायू या हवेत पसरत आहेत. ओएनजीसीच्या प्रकल्पातूनच दररोज अनावश्यक वायू जाळला जात असल्याने त्याच्या धुरामुळे उरण परिसरावर अनेकदा काळ्या ढगांचे साम्राज्य पसरलेले असते. या संदर्भात ओएनजीसी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नागरिकांना धुरापासून कोणताही त्रास होऊ नये, यासाठी उपाययोजना केल्याचा दावा केला आहे. अनेकदा या परिसरात एलपीजी हा घरगुती वापराचा वायू मोठय़ा प्रमाणात पसरण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या संदर्भात या परिसरातील ग्रामपंचायतींनी तक्रारीही केल्या आहेत. जेएनपीटी बंदरातूनही विविध प्रकारच्या रसायनांची बोटीतून आयात केली जाते. ही रसायने जेएनपीटी बंदराशेजारीच असलेल्या साठवणूक टाक्यांत ठेवण्यात येतात. त्यामुळे या परिसरात रसायनांचा उग्र वास येतो, याचा परिणाम या परिसरात काम करणाऱ्या कामगार तसेच येथील नागरिकांवरही होत आहे. नुकताच धुतूम येथील तेलसाठा करणाऱ्या कंपनीतून नाफ्ता या उग्र पदार्थाची गळती झाली होती.
या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उरणमधील विभाग अधिकारी प्रमोद डोके यांनी हवेतील प्रदूषणाची नोंद करणारी यंत्रणा उरण परिसरात नसल्याचे सांगितले. या संदर्भात प्रदूषण मंडळाचे अधिकारी तानाजी यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air pollution increases in navi mumbai
First published on: 09-09-2015 at 07:07 IST