सीबीडी बेलापूर येथील ‘अर्बन हाट’मध्ये हस्तकला बाजारात सध्या ग्राहकांची प्रदर्शन पाहण्यास आणि खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. येत्या रविवारीपर्यंत (६ मार्च) हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. हस्तकला बाजारात सजावटीचे साहित्य खासकरून विक्रीला ठेवण्यात आले आहे. घरगुती सजावटीत वैविध्यपूर्ण साहित्याची मांडणी करण्यात आली आहे.
हातमागावर विणलेले कपडे आणि विविध प्रकारच्या वेशभूषा हेही या प्रदर्शनातील ग्राहकांचे विशेष आकर्षण ठरले आहे. याशिवाय कोल्हापुरी दागिन्यांना ग्राहकांनी विशेष पसंती दिली आहे. सोन्याचा वर्ख असेलली भांडी येथे उपलब्ध आहेत. पारंपरिक पद्धतीने सुवर्ण कारागिरी केलेल्या दागिन्यांची खरेदीही मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यात विविध आकाराचे कलश, पणत्या, लॉकेट, किचेन, पंचपळी, ताम्हण, लोटे इत्यादी पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याचा समावेश आहे. त्याचबरोबर सिल्क आणि सुती साडय़ांचीही या प्रदर्शनात मांडणी करण्यात आली आहे.
याशिवाय बेडशिट, ड्रेस मटेरिअल, पडदे, सजावट केलेले दिवे, फर्निचर, महिला व पुरुषासाठी कुर्ता, पायपुसणी, चामडय़ापासून बनवलेल्या वस्तूही येथे उपलब्ध आहेत. प्रदर्शनादरम्यान संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ग्राहकांचे मनोरंजन करण्यात येत आहे.
महिला बचत गटाच्या माध्यमातून बनवलेल्या घरगुती खाद्य, मालवणी, कोल्हापुरी, कोकणी अशा विविध शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थाचीही येथे रेलचेल आहे.
मध्य प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, गुजरात, आसाम, नागालँड त्रिपुरा, तामिळनाडू, गुजरात, आसाम, नागालँड आणि त्रिपुरा अशा विविध राज्यामधील कलाकार तेथील लोकसंस्कृती तेथील वैशिष्टय़पूर्ण कलाकृती या बाजारात असल्याचे आयोजकांच्या वतीने या वेळी सांगण्यात आले.