१० फूट लांबी; समुद्रातील प्रदूषणामुळे माशांच्या मृत्यूत वाढ उरण : उरणच्या केगाव येथील खारखंड परिसरात १४ जूनला एक महाकाय असा ब्ल्यू व्हेल(देवमासा) मृतावस्थेत आढळला होता. त्यानंतर गुरुवारी त्याच किनाऱ्यावर २० ते २५ फुटाचा डॉल्फीन जातीचा एक मासा मृत अवस्थेत आढळला आहे. अशा प्रकारचे मासे मृत होण्याच्या घटना सध्या वाढू लागल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारचा एक डॉल्फीन, कासव तसेच इतर लाहन मासे केगावच्याच दांडा किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळला होता. या मृत माशांचे काय करणार या संदर्भात वन विभाग निर्णय घेणार आहे. समुद्रातील प्रदूषण व जलवाहतुकीमुळे समुद्रात वाढलेली महाकाय जहाजे असावीत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जूनमध्ये आढळलेल्या देव माशानंतर आतापर्यंतचा सर्वात मोठा डॉल्फीनचा मासा आढळला आहे. हा मासा किती दिवसांपूर्वी मृत झाला आहे, याची माहिती नाही. मात्र सध्या या मृतावस्थेत आढळेल्या माशामुळे या परिसरात त्याची दुर्गंधी पसरू लागली आहे. या संदर्भात वन विभागाला माहिती मिळाली असून त्याची पाहणी करून त्याचे काय करायचे याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती उरण वन विभागाचे वन संरक्षक शशांक कदम यांनी दिली. केगाव किनाऱ्यावर आढळलेला मासा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक येऊ लागले आहेत. उरणमधील समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या मृत माशांमध्ये विविध जातीचे मासे आढळू लागले आहेत. या समस्येवर ठोस उपाय करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तसेच संरक्षित जातीच्या माशांची सुरक्षा कशी करता येईल याचीही पाहणी संबंधित विभागांनी करण्याची मागणीही येऊ लागली आहे.