या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल तालुक्यातील चांदनेवाडी आदिवासींची व्यथा

पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या झपाटय़ाने कमी होत आहे. वावंजे केंद्रातील चांदनेवाडी येथील प्राथमिक शाळेचे भवितव्य कमी पटसंख्येमुळे धोक्यात आले आहे. याआधी ही शाळा डोंगरावर भरत असे, परंतु सहा वर्षांपासून या शाळेला हक्काची जागा न मिळल्याने ती भरवायची कुठे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. यावर उत्तर म्हणून ही शाळा शनिवार चौधरी यांच्या एक खणी घरात भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवसा शाळेसाठी जागा आणि रात्री पुन्हा कुटुंबासाठी निवारा अशी व्यवस्था चौधरी यांनी केली आहे.

सध्या चौधरींची शाळा अशी या शाळेची ओळख झाली आहे. शाळेत आठ विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत. मुख्याध्यापिका आणि एक शिक्षक यासाठी ज्ञानदानाचे काम करतात.

तळोजा औद्योगिक वसाहतीमधून दीपक फर्टिलायझर कंपनीकडून हेदुटणे गावाकडे जाणाऱ्या मार्गावर चांदनेवाडी आहे. सुमारे चार किलोमीटर लांबीचा दोन फूट खड्डय़ांनी भरलेला रस्ता तुडवून गेल्यानंतर चांदनेवाडीत प्रवेश करता येतो. यासाठी २५ मिनिटांचा पायी प्रवास करावा लागतो. हे दिव्य पार करताना कमरेभर पाण्याने भरलेला ओढा पार करावा लागतो. शनिवार आणि गुमा चौधरी यांच्या घरात ही शाळा रोज सकाळी नऊ वाजता भरते. शिक्षक रोज शाळेत येताना रस्त्यात लागणाऱ्या पाडय़ांमधील आदिवासी मुलांना हाक मारून शाळेत बोलावतात.

पनवेलच्या शिक्षण विभागाने शाळाबाह्य़ विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून मोठी आकडेवारी प्रसिद्ध केली होती; मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळीच आहे. चांदनेवाडीच्या शाळेला हक्काची जागा मिळावी, तेथे मुलांना पोषण आहार दिल्यास व शाळेत खेळण्याचे साहित्य असल्यास येथेही मुले आकर्षित होतील. मात्र या मुलांच्या अंगावर साधे गणवेश जिल्हा परिषदेने दिलेले नाहीत, अशी ही अवस्था आहे. पनवेलमध्ये तीन वर्षांपासून गट शिक्षण अधिकाऱ्याचे प्रभारी पद नवनाथ साबळे यांच्याकडे होते.

वनविभागाची परवानगी नाही

चांदनेवाडी येथील चौधरी घरात भरणाऱ्या शाळेपासूनचा सर्व परिसर वनविभागात मोडतो. त्यामुळे येथे शाळेची इमारत बांधण्यासाठी परवानगी मिळत नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. पावसाळ्यात दगडखाणींमुळे या परिसरात मोठे धबधबे तयार झाले आहेत. काही पर्यटक येथे पावसाळ्यात फिरण्यासाठी येतात आणि या शनिवार चौधरींच्या घरात भरणाऱ्या शाळेला भेट देऊन त्यांना मदत करतात. हेदुटणे येथे पहिली ते सातवी इयत्तेपर्यंतची शाळा आहे. ही शाळा रस्त्यालगत असल्याने तेथे ४० विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु चांदनेवाडीतील शाळा त्यामधील विद्यार्थी आणि शिक्षण बाह्य़ विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न येथे निर्माण झाला आहे.

कोणत्याही शाळेला जागा नसेल तर त्याबाबतची नक्की सोय लवकरात लवकर करण्यात येईल. वनविभागाची तेथे जागा असल्यास संबंधित विभागाला प्रस्ताव पाठवून तेथे शाळा बांधता येईल. अशा दुर्गम भागात शैक्षणिक कामासाठी जागा उपलब्ध करून देण्याची तरतूद वनविभागाकडे केलेली आहे.

– शेषराव बडे, जिल्हा शिक्षणाधिकारी

 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Difficult to travel school in panvel
First published on: 22-07-2016 at 00:52 IST