पूनम धनावडे

निवारा को. ऑ. हा. सोसायटी, सेक्टर ४६ सीवूड्स, नेरुळ

सीवूड्स येथील निवारा संकुलात मोकळ्या जागेत वृक्षलागवड, कचऱ्यापासून खतनिर्मिती, पाण्याची बचत अशा विविध उपक्रमांतून पर्यावरणरक्षणाचा प्रयत्न केला जात आहे. महिन्यातील एका रविवारी स्वच्छता अभियान राबवून संकुलातील वातावरण प्रसन्न राखले जाते. या उपक्रमांमध्ये सर्व रहिवासी उत्साहाने सहभागी होतात.

सिडकोने १९९७ साली सीवूड्स दारावे येथील सेक्टर ४६ व ४८ मध्ये विकसित केलेले ‘निवारा’ हे संकुल या परिसरातील आदर्श गृहसंकुल म्हणून ओळखले जाते. सिडकोने बांधलेल्या सी टाइप सुनियोजित संकुलात आठ इमारती आहेत. मध्यभागी सुटसुटीत मोकळी जागा आहे. आवारात अनेक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचे समाधान रहिवाशांना लाभते.

महापालिकेने आता संकुलात कचरा वर्गीकरण, स्वच्छता, खतनिर्मिती सक्तीची केली आहे, मात्र निवारा संकुलाने दोन वर्षांपासूनच पर्यावरणपूरक प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली होती. संकुलात सर्वत्र स्वच्छता ठेवली जाते. महिन्यातील एका रविवारी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येते, अशी माहिती येथील सदस्यांनी दिली. संकुलात एकूण १२८ कुटुंबे आहेत. प्रत्येक घरात ओला आणि सुका कचरा वेगळा गोळा केला जातो. त्याच बरोबर संकुलातील सदस्य घरातील भाजीपाला व निर्माल्य एकत्रित करून आवारात ठेवण्यात आलेल्या खतनिर्मिती प्रकल्पात टाकतात. या ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खतनिर्मिती केली जाते.

संकुलात राष्ट्रपुरुषांचे जयंती उत्सव, राष्ट्रीय सण आणि गणेशोत्सवासारखे सण-उत्सव उत्साहात साजरे केले जातात. त्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. २०१७ मध्ये ‘माझा मोरया’तर्फे संकुलातील गणेश मूर्ती आणि देखाव्याला- ‘निवाराचा राजा’ला द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाने गौरविण्यात आले होते.

संकुलावर आपत्ती ओढावू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, याचे प्रशिक्षण येथील रहिवाशांना दिले जाते. महापालिकेच्या अग्निशमन अधिकऱ्यांच्या मार्गदर्शनखाली अग्निशमन यंत्रणा व उपकरणे यांची माहिती नागरिकांना देण्यात आली आहे. साथीच्या रोगांपासून दूर राहण्यासाठी काय करता येईल, या रोगांनी आपल्या संकुलात शिरकाव करू नये यासाठी काय करावे, याची माहिती देण्यासाठी आरोग्य शिबिरेही घेण्यात आली आहेत. याअंतर्गत विविध आजारांची तपासणी, रक्त तपासणी करण्यात येते. या संकुलातील काही विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून संकुलाच्या नावलौकिकात भर पाडली आहे. २०१८मध्ये चार्टर्ड अकाउंट परीक्षेत संकुलातील दोन विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवून यश संपादन केले. उत्तम पर्यावरण, सामाजिक भान आणि खेळीमेळीचे वातावरण ही निवारा संकुलाची ओळख ठरली आहे.

महिलांचा सक्रिय सहभाग

संकुलातील एक महिला सदस्यांनी स्वत: पुढाकार घेऊन संकुलात महिलांकरिता विनामूल्य योग प्रशिक्षण आयोजित केले आहे. दररोज सकाळी ८.३० ते  ९.३० यावेळत हे वर्ग भरविले जातात. या वर्गाना चांगला प्रतिसाद लाभला आहे. संकुलातील सांस्कृतिक उपक्रमांत महिला आणि तरुण उत्साहाने सहभागी होतात.

जलमापकाच्या माध्यमातून पाणीबचत

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी संकुलातील प्रत्येक इमारतीच्या पाण्याच्या टाकीला जलमापक बसविण्यात आले आहे. प्रत्येक इमारतीच्या छतावरील पाण्याच्या टाकीत दोरीच्या साहाय्याने चेंडू टाकण्यात आला आहे. चेंडूला बांधलेली दोरी इमारतीच्या एका बाजूने खाली सोडण्यात आलेली आहे. पाण्याची टाकी भरत जाते तसे एका बाजूला बांधलेली दोरी खाली येते. टाकी भरल्याचे समजते आणि वेळेत पाणी बंद न केल्यामुळे होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येतो.

खतनिर्मितीसाठी पालिकेच्या पाठपुराव्याची गरज

या संकुलात सोसायटी पातळीवर खतनिर्मिती प्रकल्प राबवला जात आहे. परंतु त्याचबरोबर प्रत्येक घरागणिक खतनिर्मिती करण्याची योजना आखण्यात आली होती. काही नागरिकांनी घरच्या घरी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रक्रिया सुरू केली होती. परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने ही योजना प्रत्यक्षात आणण्यात अडचणी येत आहेत. महापालिका प्रशासनाने सतत प्रत्येक संकुलात याचा पाठपुरावा करून हा प्रकल्प यशस्वी होत आहे का, रहिवाशांना मार्गदर्शनाची गरज आहे का हे जाणून घेणे गरजेचे आहे, असे मत येथील रहिवाशांनी व्यक्त केले.

govinddegvekar@expressindia.com