पाच हजार रुपये खर्च करा, संतती जन्माला येईल अशी बतावणी करणाऱ्या भोंदूबाबाला चित्ता कॅम्प, मुंबई येथून कामोठे पोलिसांनी अटक केली. पीडित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी या भोंदूबाबाला ताब्यात घेण्यात आले आहे. मेलवेल मन्नील्यम अर्जन ऊर्फ वीरप्पन बाबा (रा. ट्रॉम्बे, चेंबूर) असे अटकेत असणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेला तिचे सासू-सासरे दोन वर्षांपूर्वी वीरप्पनकडे मुलगा होत नाही म्हणून घेऊन गेले होते. मात्र वेळोवेळी पीडितेला वीरप्पन बाबा संतती होण्यासाठी संपर्क साधून स्वत:शी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी तगादा लावत होता. तसेच पीडितेने सासू-सासऱ्यांविरोधात छळ केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणातील सासू-सासरे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. इतरांना संततीचा प्रसाद देणारा वीरप्पन पत्र्याच्या खोलीत राहत असल्याचे पोलिसांना अटक करताना आढळले. सध्या हा भोंदूबाबा १९ तारखेपर्यंत चौकशीसाठी कामोठे पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake godman arrested from kamothe
First published on: 30-12-2015 at 00:01 IST