३० ते ४० टक्क्यांची दरवाढ; खवय्यांच्या खिशाला कात्री

गेल्या आठवडय़ातील ओखी वादळामुळे खोल समुद्रातील मासेमारी बंद होती. त्याचा परिणाम मासळीच्या आवकवर झाला असून दर वाढल्याने खवय्यांच्या खिशालादेखील चाट बसू लागली आहे. असे असले तरी हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येईल आणि यापूर्वी आलेल्या वादळांचा फायदा हा मासेमारी व्यवसायाला झाला असल्याने येत्या काही दिवसांतच ही स्थिती बदलेल, अशी शक्यता मच्छीमारांकडून व्यक्त केली जात आहे.

उरण तालुका मिळून जवळपास ८००पेक्षा अधिक छोटय़ा, मोठय़ा मासेमारी बोटी आहेत. यामध्ये सहा सिलेंडरच्या मोठय़ा बोटींचादेखील समावेश आहे. या बोटींच्या साहाय्याने खोल समुद्रात मासेमारी केली जाते. परंतु नुकत्याच झालेल्या ओखी वादळामुळे समुद्र खवळून निघाला असल्याने अनेक उलथापालथ झाली आहे. त्याचा चांगला आणि वाईट असा दोन्ही परिणाम होतो. त्यामुळे वादळ हे मच्छीमारांसाठी फायद्याचे तसेच नुकसानीचेही ठरते.

परकीय चलनाचा स्रोत

राज्यात मच्छीमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबाची संख्या मोठी असून १५ लाखांपेक्षा अधिक लोकांना या व्यवसायातून रोजगार उपलब्ध होतो. दरवर्षी राज्यात एकूण ४ लाख ६७ हजार ४५८ मेट्रिक टन मासळीचे उत्पादन होत असून यापैकी परदेशात निर्यात होणाऱ्या मासळीच्या उत्पादनातून केंद्र सरकारला २ हजार ८०० कोटींचे परकीय चलन मिळते. त्यामुळे हा व्यवसाय परकीय चलनासाठीही महत्त्वाचा आहे.

ओखी वादळानंतर पुन्हा एकदा मासेमारीसाठी बोटी समुद्रात गेल्या आहेत. यापैकी खोल समुद्रातील बोटींना परतीसाठी काही दिवस लागणार असून किनाऱ्यावरील बोटी परतूदेखील लागल्या आहेत. मात्र या बोटींमधून मासळीची झालेली आवक पाहता वादळाचा परिणाम या व्यवसायावर झाला आहे. त्यामुळेच मासळीच्या दरांत वाढ झाल्याचे दिसत आहे.

– शिवदास नाखवा, अध्यक्ष, करंजा मच्छीमार सोसायटी

मासळीची आवक घटल्याने दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढलेले आहेत. त्यामुळे मासळी खाणे अवघड झाले असून सध्या चांगली मासळी बाजारात येत नसल्याचे दिसत आहे.

अमित पाटील, नागरिक.