नवी मुंबई: केंद्र सरकारमध्ये उच्च पदस्थ अधिकारी असल्याची बतावणी करीत बँकेतील ओळखीतून चाळीस कोटींचे व्यवसायिक कर्ज मिळवून देतो असे आमिष दाखवून २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत आरोपीच्या विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत महाडिक असे यातील आरोपीचे नाव आहे. तर दिगंबर लव्हाळे असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांना २० कोटींचे व्यवसायिक कर्ज हवे होते. यासाठी कोणी कर्ज मिळवून देणाऱ्याच्या ते शोधात असताना त्यांचा परिचय प्रशांत महाडिक यांच्याशी झाला. प्रशांत हा स्वतः केंद्र सरकार मध्ये मोठ्या पदावरील अधिकारी असल्याचे सर्वांना भासवत होता. तसे त्याच्या कडे बनवत ओळख पत्रही होते. त्याच्याशी संपर्क आल्यावर दिगंबर यांनी कर्जाबाबत बोलणे केले असता हे कर्ज सहज मिळवून देऊ शकतो बँकेत अनेक ओळखी आहेत असे त्याने भासवले.
हेही वाचा : जनसहभागातून गर्दुल्ल्यांचा अड्डा उद्ध्वस्त, कोपरखैरणे पोलिसांची कामगिरी
मात्र यासाठी विविध शुल्क द्यावे लागेल असे सांगत जानेवारी २०२१ पासून २४ एप्रिल २०२४ पर्यंत टप्प्या टप्प्याने तब्बल दोन कोटी रुपये दिगंबर यांच्या कडून प्रशांत याने घेतले. मात्र दर वेळी कर्ज मिळेल असेच आश्वासन दाखवले जात होते. त्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर दिगंबर यांनी नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. या तक्रार अर्जाची शहानिशा करून पोलिसांनी प्रशांत याच्या विरोधात आर्थिक फसवणूक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.