* मातीच्या भरावामुळे पक्ष्यांची मुख्य ठिकाणे नष्ट होण्याच्या मार्गावर
* उरण-पनवेल मार्गावरील दास्तान फाटय़ात मुक्काम
उरणमधील जेएनपीटी परिसरातील पाणजे व डोंगरी येथे दर वर्षी फ्लेमिंगोसह इतर जातींचे पक्षी हजारोंच्या संख्येने येत आहेत. परिसरात सध्या मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू असल्याने पाणथळ्यांच्या शोधात या पक्ष्यांची या परिसरात भटकंती सुरू आहे. शेकडो पक्ष्यांनी सध्या उरणच्या दास्तान फाटय़ाजवळ आपले बस्तान मांडले असून येथील खाडीचे पाणी त्यांची तहान भागवत आहे.
हिवाळ्यात मुंबई आणि उरणचे खाडीकिनारे फ्लेमिंगोसह इतर विविध पक्ष्यांना आकर्षित करू लागले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अरबी समुद्र व या परिसरातील कांदळवन (खारफुटी)मुळे मासळीच्या प्रजननाची होणारी प्रक्रिया व त्यातून निर्माण होणारे कीटक, छोटे मासे हे मुख्य खाद्य होय. हे खाद्य येथे मोठय़ा प्रमाणावर येथे मिळत असल्याने पक्षी या परिसरात हजारोंच्या संख्येने येत आहेत.
सुरुवातीला न्हावा शेवा पोलीस ठाण्यासमोर असलेल्या मिठागर परिसरात या पक्ष्यांचे वास्तव्य असायचे. तेथे मातीचा भराव झाल्याने ते पाणजे खाडीच्या आसऱ्याला गेले. सध्या या परिसरातही भरावाचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे जेएनपीटीच्या लँडिंग जेटीजवळील परिसरात सध्या रात्रंदिवस वाहने चालत असल्याने पक्ष्यांची मुख्य ठिकाणे नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेकडो पक्ष्यांनी सध्या उरण पनवेल राज्य महामार्ग क्रमांक ५४ वरील दास्तान फाटा परिसरातील खाडीमध्ये आपले नवे ठिकाण शोधले आहे. निसर्गातील या पक्ष्यांच्या सुरक्षेची व त्यांच्या सुरक्षित व कायमस्वरूपी पानथळ्यांची मागणी येथील निसर्ग व पक्षिप्रेमींकडून केली जात आहे.