नवी मुंबई : नवी मुंबई मनपाचा उपक्रम असलेली एनएमएमटीची बस कितीही उत्तम सुविधा देत असल्याचा दावा केला जात असला तरी एनएमएमटीच्या ताफ्यातील डिझेल बसची अत्यंत दुरवस्था झाली आहे. दरवेळी तात्पुरती डागडुजी करून बस मार्गस्थ केली जात आहे. अत्यंत अस्वच्छ, फाटलेले सीट कव्हर, तुटलेली आसने, उभ्या प्रवाशांना आधार म्हणून कसेबसे उभे असलेले खांब, त्यात गिअर बदलताना चालकाची होणारी तारांबळ अशा अवस्थेतून डिझेल बसमधून प्रवास केला जात आहे.

वर्षानुवर्षे डिझेल बसगाड्यांच्या तांत्रिक व अन्य तपासण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. एनएमएमटी प्रशासनाबरोबरच उपप्रादेशिक कार्यालयालयाकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अशा बसमधून प्रवास करण्यास केवळ प्रवासीच नव्हे तर तर वाहनचालक, वाहकसुद्धा नाखूश असतात.

हेही वाचा : ३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन

नवी मुंबई महापालिकेचा कायम तोट्यात असलेला उपक्रम म्हणून एनएमएमटी बससेवा ओळखली जात आहे. या सेवेची दोन टोके असून त्यात आलिशान आणि उत्तम अशी विद्याुत बस सेवा आहे. तर दुसरे टोक म्हणून सीएजी आणि डिझेल बस. ज्याला खटारा बस म्हणून ओळख मिळालेली आहे. या बस गाड्यांकडे एनएमएमटी प्रशासन गांभीर्याने पाहताच नाही असा आरोप खुद्द एनएमएमटीमध्ये काम करणारे कर्मचारी करतात. एखाद्या बसचे इंजिन उत्तम असेल तर बसवर चांगल्या प्रकारे खर्च करून उत्तम सेवा प्रवाशांना देण्याऐवजी कायमच तात्पुरती डागडुजी करून बस प्रवासी सेवेला दिली जाते. अशा बसचे टायर हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असून महिन्यात किमान ५० वेळा तरी बस पंक्चर झाल्याच्या घटना घडतात. हे प्रमाण आसूडगाव डेपोच्या बस सेवेत जास्त आहे, असा दावा तंत्रज्ञ करतात.

हेही वाचा : पनवेलमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार

आरटीओकडून कारवाई का नाही?

नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अशा गाड्यांवर कारवाई कशी करत नाही हाच प्रश्न सजग प्रवाशांना पडतो. खासगी गाड्यांचा फिटनेस दरवर्षी उपप्रादेशिक परिवहन विभागाला देणे भाग असते, अशात या बसकडे का दुर्लक्ष केले जाते? या बस गाड्यांमधील अग्निसुरक्षेसाठीचे सिलिंडर बेपत्ता असून त्याचे स्टॅन्ड वाकडेतिकडे झालेले दिसतात. अशा गाड्यांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो हे तरी लक्षात घेणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया निवृत्त अभियंता उत्तम जाधव यांनी दिली.