नवी मुंबई : निवडणूक आयोगाकडून मतदार पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला असून ५ जानेवारीपर्यंत अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील राजकीय पक्षांनी नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पदाधिकाऱ्यांना नोंदणी करण्यासाठी आदेश दिले आहेत.

करोनामुळे नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ शकली नाही, त्यामुळे महापालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. गेल्या दीड वर्षांत अनेकदा निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाल्याने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करीत मतपेरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची निराशा झाली. आता करोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने पुन्हा एकदा निवडणुका होण्याची

शक्यता असून निवडणूक आयोगानेही तयारी सुरू केली आहे. त्यासाठी नवमतदरांच्या नोंदणीसाठी मतदार पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला असून ५ जानेवारीपर्यंत अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.

त्यामुळे राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला आहे. आपल्या मतदार संघातील तसेच स्थानिक नगरसेवक प्रभागामध्ये नवीन मतदारांची नोंद करण्यासाठी राजकीय पक्ष महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे निवडणूक आयोगाकडूनही पदाधिकाऱ्यांना मतदार याद्या पाठवण्यात आल्या आहेत. आपल्या विभागातील नवीन मतदार नोंदणी तसेच छायाचित्र नसल्याल्या मतदारांचा शोध घेतला जात आहे. वगळण्यात आलेली नावे पुन्हा कायम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

नवी मुंबईत बेलापूर व ऐरोली हे दोन मतदार,संघ असून ऐरोली मतदारसंघात ९८,२७६ तर बेलापूर मतदारसंघात ६४,५०७ मतदारांचे मतदारयादीत छायाचित्र नसल्याने त्यातील अनेकांची नावे वगळली आहेत. त्यामुळे असे मतदार शोधून त्यांची फोटोसह नोंदणी करावी लागणार आहे.  निवडणुकीपूर्वी नव मतदारांची नावे नोंदवण्याची ही अखेरची संधी मतदारांना आहे. त्यामुळे नवमतदारांची नावे नोंदवण्यासाठी व छायाचित्र नसलेल्यांची नावे फोटोसह नोंद करण्यासाठी सहकार्य करण्याचे आदेश पक्षाकडून दिले आहेत. त्याप्रमाणे मतदार नाव नोंदणी व जागृती करण्यात येत असल्याचे  शिवसेना पदाधिकारी समीर बागवान यांनी सांगितले.

मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम

* एकत्रित मतदारयादी प्रसिद्ध : १ नोव्हेंबर

* दावे व हरकती : १ नाव्हेंबर  ते ३० नोव्हेंबर

विशेष मोहिमांचा कार्यक्रम : १३,१४, २७,२८ नोव्हेंबर

* दावे व हरकती निकालात काढणे : २० डिसेंबरपर्यंत

* मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी :५ जानेवारी २०२२

छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार मतदारयादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. तत्पुर्वी मतदारांनी छायाचित्रांसह आपली नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. छायाचित्र नसलेली नावे वगळण्यात आली आहेत.

ज्ञानेश्वर खुटवड, मतदार नोंदणी अधिकारी, बेलापूर १५१