नवी मुंबई : कांद्याचे दर वाढल्याने इराणवरून कांद्याची आयात करण्यात आली असून सोमवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजारात एक गाडी (१० टन) कांदा दाखल झाला. बाजारात सध्या देशी कांद्याला ३१ ते ३३ रुपये प्रतिकिलो घाऊक दर असून इराणच्या कांदा प्रतिकिलो २० रुपयांनी विकण्यात आला.राज्यात गेले काही महिने अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे नवीन कांदा उत्पादनावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे कांदाचे दर वाढलेले आहेत. घाऊक बाजारात ३० ते ४० रुपयांपर्यंत असलेले कांदा दर किरकोळ बाजारात अधिक दराने विकला जात आहे. आगमी काळात दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

वाढते दर आणि मागणी

पाहता व्यापाऱ्यांनी परदेशी कांद्याची आयात करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी इराणमधून २४ कंटेनर कांदा दाखल झाला आहे. सध्या या कांद्याचे एपीएमसीतील कोठारात वर्गीकरण सुरू असून सोमवारी बाजारात एक गाडी (१०टन) कांदा विक्रीसाठी उपलब्ध झाला होता. उरणमधील जेएनपीटी बंदरात आणखी ३५ कंटेनर कांदा दाखल झाला आहे.