लोकसत्ता विकास महाडिक

नवी मुंबई</strong> : करोना साथ रोगामुळे दोन वर्षांपूर्वी काढण्यात आलेल्या नवीन घरांच्या सोडतीतील ताबा देण्यास एक वर्षांचा विलंब झाल्याने सिडकोने संकल्प केलेल्या घरांची विक्री करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे या महागृहनिर्मितीत शिल्लक राहिलेली काही घरे कोविड योद्धय़ांना तसेच गणवेशधारी कर्मचाऱ्यांना देऊन प्रतीक्षा यादीवरील लाभार्थीना देखील घरे जाहीर करण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यानुसार प्रतीक्षा यादीवरील तीन हजार लाभार्थीना इरादा पत्रे दिली जात असतानाच सिडकोने दिवाळीत आणखी घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.

किती घरांची सोडत काढावी याबाबत मात्र अद्याप संख्या निश्चित करण्यात आलेली नाही. सिडकोने सुमारे ६५ हजार घरे बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला असून प्रत्यक्षात २४ हजार घरांचे काम सुरू आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या सूचनेवरून सिडकोने महागृहनिर्मितीचा प्रकल्प पाच उपनगरात सुरू केला आहे. यातील घरे विकण्याची प्रक्रिया २ ऑक्टोबर २०१८ रोजी सुरू करण्यात आली असून दोन वेळा काढण्यात आलेल्या सोडतीत २४ हजार घरांची सोडत काढण्यात आली आहे. यातील पाच हजार घरांचा ताबा देण्याचे काम जुलैपासून सुरू आहे. शिल्लक घरांची विक्री सिडको प्रतीक्षा यादीवरील लाभार्थीसाठी इरादा पत्र देऊन करीत आहे. या घरांना कमीत कमी अडीच तर जास्तीत जास्त चार लाख रुपये किमती वाढ करण्यात आल्याने लाभार्थीमध्ये नाराजी आहे. मात्र सिडको सध्या कोविड योद्धय़ांना विक्री करीत असलेल्या दरातच ही घरे दिली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. कोविड योद्धा व गणवेशधारी कर्मचाऱ्यांच्या पेक्षा कमी दरात प्रतीक्षा यादीवरील लाभार्थीना घरे दिल्यास तो कोविड योद्धय़ांवरील अन्याय ठरेल असे सिडको प्रशासनाचे स्पष्टीकरण आहे.सध्या बांधकाम सुरू असलेल्या २४ हजार घरांची विविध प्रकारे विक्री सुरू असताना सिडकोने महागृह निर्मितीतील आणखी चार ते पाच हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. गेली दीड वर्षे रखडलेल्या महागृहनिर्मितीला वेग देण्याचा सिडकोचा हा प्रयत्न असून यासाठी पणन विभाग सक्षम केला जाणार आहे.

ही घरे एखाद्या बाह्य़ पणन कंपनीच्या माध्यमातून विकण्याचाही प्रस्ताव तयार केला जात आहे. सिडकोचे महागृहनिर्मितीच्या बांधकामांवर वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून काही घरे ताबा न घेता अडकून पडल्याने सिडकोचे ५०० ते ६०० कोटी रुपये अडकून पडलेले आहेत. या प्रकल्पातील घर लवकरात लवकर वसूल करण्याच्या

दृष्टीने सिडकोने आणखी एका सोडतीची तयारी सुरू केली असून दिवाळीत ही सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी काढण्यात आलेल्या दोन्ही सोडती या आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ, अल्प उत्पन्न गटासाठी असल्याने यातून सिडकोला फारशी कमाई झालेली नाही. केंद्र व राज्य सरकारने पंतप्रधान आवास योजनेतील हिस्सा न भरल्याने सिडकोला ३०० कोटी आगाऊ तो हिस्सा द्यावा लागला आहे. त्यामुळे केवळ खर्चाच्या घाईत लोटलेल्या सिडकोला कमाई करण्याच्या दृष्टीने यावेळी उच्च उत्पन्न गटासाठी ही सोडत काढण्यात येणार असल्याचे समजते.ं

४,४८८ घरांची सोडत २९ ऑक्टोबर रोजी

सिडकोने कोविड योद्धा व गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी दोन वेळा मुदतवाढ दिली आहे. काही प्रमाणपत्र जमा करण्यास या योद्धय़ांना वेळ लागत असल्याने सिडकोने ही मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले आहे. त्यांची मुदत २१ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. ४,४८८ घरांसाठी सोडत येत्या २९ ऑक्टोबर रोजी काढली जाणार असून ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना नाही. त्यामुळे या ४४८८ घरांसाठी राज्यातून १५ ते २० हजार अर्ज येण्याची शक्यता लक्षात घेऊन सिडको ही सोडत काढून यातील भाग्यवंतांना घरे वितरित करणार आहे. त्यानंतर या महागृहनिर्मितीतील तिसऱ्या सोडतीचा विचार केला जाणार आहे.