पनवेल पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी

पनवेल : महापालिका खारघर येथे उभारत असलेल्या महापौर निवासाचा खर्च आणखी ११ कोटी रुपयांनी वाढला असून या खर्चाला सोमवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. यासह अजून २२ विषय मंजूर करण्यात आले. मात्र महापौर निवासाच्या बांधकामासाठी लागणारा वेळ पाहता पहिल्या पाच वर्षांत पनवेलच्या पहिल्या महापौरांना त्यांच्या निवासात जाणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत पालिका क्षेत्रातील नागरिकांच्या अंत्यविधीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या विषयाला मंजुरी घेण्यात आली आहे. यात लाकडावरील सरपणावर अंत्यविधी केल्यास २५०० तसेच गॅसदाहिनीवर अंत्यविधी केल्यास शंभर रुपये करण्याचा निर्णय पालिका सदस्यांनी घेतला. यापुढे पालिका क्षेत्रातील ज्या ठिकाणी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे पाणी पोहोचत नाही अशा गृहनिर्माण संस्था, गावे अशांना पालिका मोफत पाणी देणार असल्याचा निर्णय सभेत सदस्यांनी घेतला. मात्र वापरापेक्षा अधिकच्या मागणी असणाऱ्यांकडून पालिका पाणी शुल्क अधिकचे वसूल करण्याचे ठरले.

सोमवारी वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने  ६६ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या मान्यतेनंतर आणि मागासवर्गीय कक्ष यांच्याकडील िबदुनामावली झाल्यावर तीन वर्षांसाठी ठोक मानधनावर पालिका ही पदे भरणार आहे. सदस्यांनी मंजुरी दिल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पालिका या पदांच्या भरतीसाठी मागणी करणार आहे. यामध्ये वर्ग अ ब क ची पदे आहेत. यामध्ये सर्वाधिक पदे वर्ग ३ मध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ५ वैद्यकीय अधिकारी, प्रत्येकी एका पालिका उपसचिव, साहाय्यक नगररचनाकार, सांख्यिकी अधिकारी, आगार व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) ही ८ पदे, तर प्रत्येकी सहा पदे वीज विभागातील कनिष्ठ अभियंता, उपलेखापाल, कनिष्ठ लेखा परीक्षक अशी आहेत.

भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे स्वीकृत सदस्य शंकर सदू म्हात्रे यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिल्यामुळे कामोठे येथील सखाराम पाटील यांच्या नामनिर्देशन अर्जाला मान्यता देण्यात आली. तसेच भारतीय जनता पक्षाने स्थायी समितीवरील नवनिर्वाचित सदस्य महादेव जोमा मधे यांनी वैयक्तिक कारण पुढे करत सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने मधे यांच्या पदावर माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांना भाजपने संधी देऊन त्यांची नाराजी दूर केल्याची चर्चा सभागृहात होती.

नाटय़गृहातील  भाडेदरात सवलत

सभेत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहातील दैनंदिन भाडे दरात शासननिर्णयप्रमाणे ७५ टक्के सवलत देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच तीन प्रभाग समिती कार्यालय उभारणीबाबत सुमारे २१ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

रस्ते स्वच्छतेसाठी सफाई यंत्र

रस्ते स्वच्छ करण्यासाठी पालिका सुमारे ५ कोटी ६१ लाख रुपयांच्या २ सफाई यंत्र पालिका घेणार आहे. यामुळे यांत्रिकी झाडू पनवेलच्या रस्त्यांवर आणि महामार्गावर मारताना दिसणार आहे.

भव्य निवास

  • महापौर निवासासाठी सुरुवातीला साडेतीन कोटी रुपयांचा खर्च पालिकेने खारघर सेक्टर २१ मधील भूखंड क्रमांक १५१ वर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यामध्ये दुपटीची वाढ करण्यात आली.
  • सध्या साडेसात कोटी रुपयांच्या खर्चानंतर पालिका प्रशासनाने त्यामध्ये अजून ११ कोटी रुपयांच्या खर्चाची वाढ केली आहे. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीनंतर हे महापौर निवास दुसऱ्या क्रमांकाच्या महापौरांना वापरायला मिळणार आहे.
  • मुंबईच्या महापौरांप्रमाणे भव्य महापौर निवास असावे, अशी संकल्पना आयुक्त गणेश देशमुख यांची आहे.