नवी मुंबई : कोपरखैरणेत एका युवतीने आत्महत्या केल्याची घटना डिसेंबर महिन्यात घडली होती. मात्र तिच्या परिचित युवकाने दिलेल्या मानसिक त्रासामुळे तिने आत्महत्या केली असा दावा तिच्या पालकांनी केला होता. याबाबत काही ठोस पुरावे सादर करूनही त्या युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला जात नव्हता. अखेर आयुक्तांपर्यंत प्रकरण गेल्यावर मात्र आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश जाधव आणि हर्ष जाधव अशी यातील आरोपींची नावे आहेत.

कोपरखैरणे येथे राहणाऱ्या एका १८ वर्षीय युवतीला आत्महत्या करण्यास भाग पाडले म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा… नवी मुंबई: एपीएमसीत सामायिक जागेचा वापर करणाऱ्यांवर कारवाई

पीडित युवती ज्या इमारतीत राहत होती त्याच इमारतीत आरोपींचे मामा राजू धनावडे राहत होते. तर आरोपी उल्हासनगर येथे राहणारे असून धनावडे यांच्याकडे दोन्ही आरोपींचे नेहमी येणे-जाणे होते. त्यामुळे आरोपींची जुजबी ओळख पीडितेशी झाली होती. त्यातून आरोपी यश याचे युवतीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र युवती शिक्षणाला महत्त्व देत शिकत होती.

दरम्यान त्या युवकाने तिला मानसिक त्रास देणे सुरू केले. त्यात इन्स्टाग्रामवर शारीरिक सुखाची मागणी यश जाधव याने केली. या मानसिक धक्क्यातून ती सावरत नाही तोच तिच्या घराजवळ राहणाऱ्या हर्ष जाधव याने तिच्याशी भांडण उकरून काढले. या सर्व प्रकरणाने वैतागून सदर युवतीने १ डिसेंबरला रात्री राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.

हेही वाचा… “ती वादग्रस्त जाहिरात”; आचारसंहिता भंग गुन्हा दाखल 

पीडित युवतीने आरोपींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली.