नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी शहरात पहिल्या टप्प्यात २० चार्जिग केंद्रे उभारण्याची घोषणा केली होती. यातील पहिल्या केंद्राचे काम ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. पुढील १५ दिवसांत हे केंद्र कार्यान्वित करण्यात येईल असे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारने फेम योजनेअंतर्गत विद्युत वाहनांची निर्मिती व वापर वाढावा यासाठी विशेष धोरण आणले आहे. याअंतर्गत २०३० पर्यंत किमान १८ टक्के वाहने ही विजेवर चालणारी असावीत हे धोरण आहे. महाराष्ट्र शासनानेही नुकतेच आपले धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार सध्या बाजारात दुचाकी, चारचाकी, तीनचाकी व बस ही विजेवर चालणारी वाहने बाजारात येत आहेत. एनएमएमटीच्या १८० विद्युत बस आल्या असून त्यातल्या ५० बस सध्या सेवा देत आहेत. तर दुचाकींमध्ये सध्या अनेक पर्याय आले आहेत. चारचाकीमध्येही पाच ते सहा कार सध्या बाजारात आहेत. मात्र पायाभूत सुविधा नसल्याने अजूनही त्यांना मागणी वाढताना दिसत नाहीत. शहरात चार्जिग केंद्रे असणे यासाठी गरजचे आहे.

त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने शहरात २० मोक्याच्या  ठिकाणी चार्जिग केंद्र उभारण्याची घोषणा केली होती. मात्र त्याला गती आली नव्हती. मागील आठवडय़ात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत या विषयाला हात घालत चार्जिग केंद्रे उभारण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर या कामाला गती आली आहे.

नवी मुंबई महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवून हे काम पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन यांना दिले असून त्यांनी नेरुळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील काम वेगाने सुरू केले आहे. या ठिकाणी सहा युनिट उभारली जाणार आहेत. यातील दोन युनिटचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. नागरिकांच्या प्रतिसादानुसार त्यात वाढ केली जाणार आहे. पुढील १५ दिवसांत हे केंद्र कार्यान्वित होईल, असा विश्वास पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला आहे. शहरात अशी २० चार्जिग केंद्रे उभारण्यात येणार आहेत. सदर कंपनीला केंद्र शासनाकडून ‘फेम २’ योजनेतून अनुदानही दिले जाणार आहे.

प्रत्येक केंद्रात कॅफेटेरिया, वॉशरूम

एक वाहन चार्जिग करण्यास किमान अर्धा ते एक तास इतका कालावधी लागतो. त्यामुळे या वेळात वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक चार्जिग केंद्रात कॅफेटेरिया, वॉशरूम आदी सुविधा असतील.

आणखी दहा केंद्रांसाठी निविदा

पहिल्या टप्प्यात २० चार्जिग केंद्रे उभारणार असून यासाठीचे काम सुरू झाले आहे. याव्यतिरिक्त आणखी १० केंद्रे उभारण्याचे नियोजन असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे. पुढील काळात ३० केंद्रे वाहनचालकांसाठी उपलब्ध होणार आहेत.

चार्जिग केंद्रे

नेरुळ : सेक्टर ३

बस स्थानक, सेक्टर १२ बस स्थानक, सेक्टर १९ ए चिल्ड्रन पार्क, सेक्टर २६ होल्िंडग पॉन्ड, सेक्टर ३८ पार्किंग आणि सेक्टर २२.

बेलापूर : सेक्टर ८

बस स्थानक, सेक्टर १५,

सेक्टर २१/२२ पार्किंग जागा आणि सेक्टर १५.

कळंबोली : केडब्ल्यूसी बस स्थानक

महापे : एमआयडीसी बस स्थानक

घणसोली : घणसोली सेक्टर ३ सेंट्रल पार्क,

ऐरोली : सेक्टर १९ व सेक्टर१७

कोपरखरणे : सेक्टर१४ व सेक्टर १

रबाळे :सेक्टर ६ बस स्थानक

वाशी : सेक्टर १ ए 

नवी मुंबई शहरात २० चार्जिग केंद्रे उभारण्यात येत असून पुढील १५ दिवसांत ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील चार्जिग केंद्रांची सुरुवात करण्यात येणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या विद्युत वाहनांचा वापर मोठय़ा प्रमाणात व्हावा यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.

-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका