औद्योगिक क्षेत्रातील दुर्गंधीने नवी मुंबईकर हैराण; पालिका-प्रदूषण नियंत्रण मंडळाची टोलवाटोलवी

ठाणे-बेलापूर मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना नाक मुठीत धरावे लागण्याचा अनुभव काही नवा नाही. या परिसरातील प्रवासी आणि रहिवाशांचे उग्र दर्पामुळे हाल होत असताना, त्यावर तोडगा काढण्याऐवजी पालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात मग्न झाले आहेत. एमआयडीसी परिसरातील कारखान्यांमधून रासायनिक द्रव्ये नाल्यात सोडण्यात येत असल्याचा दावा पालिकेने केला आहे, तर रहिवासी क्षेत्रासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र नसल्यामुळे आणि नालेसफाईही वेळेवर होत नसल्यामुळे ही समस्या उद्भवल्याचा दावा करत एमपीसीबीने ही जबाबदारी पालिकेवर ढकलली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ठाणे-बेलापूर मार्गाच्या पूर्वेस अशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा आहे. तर पश्चिमेस सिडकोने उभारलेली नागरी वसाहत आहे. मात्र एमआयडीसी पट्टय़ातून येणारे नाले हे खाडीला जाऊन मिळतात. या नाल्यांतून उग्र वास येत असल्याने ठाणे-बेलापूर मार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी आणि या भागातील झोपडपट्टीवासीयही या उग्र दर्पाने त्रस्त आहेत. डोकेदुखी, मळमळ, भोवळ असे अनेक त्रास त्यांना सहन करावे लागत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी पत्रव्यवहार केला होता. ८३ कंपन्यांतील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच नाल्यात सोडले जात असल्याची तक्रार यात केली होती. यावर प्रदऊषण नियंत्रण मंडळ व नवी मुंबई महानगरपालिकेच्या पथकाने १६ सप्टेंबरला ८३ कंपन्यांचा पाहणी केली. यात कोणत्याही कंपनीने रसायनिक सांडपाणी नाल्यामध्ये सोडले नसल्याचे स्पष्ट झाले. औद्योगिक पट्टय़ामध्ये नागरी वसाहत आहे. या भागात मलनिस्सारण वाहिन्या नसल्यामुळे झोपडपट्टय़ांतील सांडपाणी थेट नाल्यांत सोडण्यात येते. या नाल्यांची सफाई वेळच्या वेळी होत नसल्यामुळे कचरा, गाळ साचून उग्र दर्प पसरतो, असा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा आहे.

वायुप्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई

ठाणे बेलापूर औद्योगिक पट्टय़ात जानेवारी ते डिसेंबर २०१६ या काळात ३७ कंपन्यांवर वायुप्रदूषणाप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. या कंपन्यांना टाळे ठोकण्यात आले. पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अनिल मोहेकर यांनी दिली.

कंपन्यांचे रासायिकन सांडपाणी नाल्यात सोडण्यात येते. त्यामुळे दुर्गंधी पसरते. पूर्वी खाडीच्या काठावर मासे मिळत, मात्र आता रासायनिक सांडपाणी खाडीच्या पाण्यात मिसळले जाते. त्यामुळे मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

– सचिन पाटील, रहिवासी

प्रदूषण नियंत्रण मंडळ व पालिकेचे कंपन्यांबरोबर साटेलाटे आहे. कंपन्यांचे रासायनिक पाणी साठवण्यात येते. पालिका जेव्हा मलनिस्सारण केंद्राच्या व पाण्याच्या टाक्या धुऊन पाणी नाल्यात सोडते, तेव्हाच कंपन्या रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडतात. प्रदूषण नियंत्रण मंडळ दिवसा पाहणी करते. पण रासायनिक सांडपाणी रात्रीच्या वेळी सोडण्यात येते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने रात्री पाहणी करणे गरजेचे आहे.

– बाळासाहेब शिंदे, अध्यक्ष, पर्यावरण सेवाभावी संस्था

पावणे येथील कंपन्यांमधून रासायनिक पाणी नाल्यामध्ये सोडण्यात येते, असे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यांनी या सांडपाण्याची तपासणी करून घेतली असता कंपनीमधील रासायनिक पाणी नाल्यामध्ये सोडण्यात येत असल्याचे दिसले. पालिकेच्या आरोग्य विभागाने एमपीसीबीशी संपर्क साधला आहे. कारवाई करण्याचा अधिकार प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहे.

मोहन डगावकर, शहर अभियंता, नवी मुंबई महानगरपालिका

औद्योगिक पट्टय़ातील रासायनिक सांडपाणी नाल्यामध्ये सोडले जात नसल्याचे पालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीत स्पष्ट झाले. एमआयडीसी पट्टय़ामध्ये नागरी वसाहत देखील आहे. मात्र नागरी वसाहतीत सांडपाणी वाहिन्या, मलप्रक्रिया केंद्र नसल्यामुळे दूषित पाणी नाल्यामध्ये थेट सोडण्यात येते. त्यामुळे नाल्यांमधून दुर्गंधी येते.

– अनिल मोहेकर, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

प्रदूषणाच्या पातळीत पुन्हा वाढ

* नवी मुंबईतील प्रदूषणाची पातळी पुन्हा वाढली आहे. हिवाळा आणि पीएम २.५ या धुलिकणांचे प्रमाण वाढल्यामुळे प्रदूषण वाढल्याचे, नवी मुंबई महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.

*  सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन या रासायनिक घटकांबरोबरच पी.एम. २.५ आणि पी.एम. १० प्रकारच्या धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे. ’ ठाणे-बेलापूर मार्ग, शीव-पनवेल महामार्ग आणि जेएनपीटी मार्गामुळे या भागात प्रदूषणचे प्रमाण मोठे आहे. खैरणे, महापे, पावणे या भागातील काही रंगांचे कारखाने हवेत प्रदूषित घटक सोडतात. त्यामुळे प्रदूषणात भर पडते. कारखान्यांवर कारवाई होत नसल्याने त्यांच्याकडून प्रदूषण सुरू आहे.