नेरुळ पूर्व-पश्चिम जोडणारा ‘सेतू’ कागदावरच

नेरुळ हे नवी मुंबईतील विस्ताराने व लोकसंख्येने मोठे उपनगर. त्यामुळे या उपनगराच्या विस्तारामुळे तेवढीच दळणवळणाची आवश्यकता आहे.

(संग्रहित छायाचित्र)

संतोष जाधव 

१३ वर्षे पाठपुरावा; आयुक्त निवास ते सेक्टर २८ पूल

वाशी-बेलापूर रेल्वेमुळे नवी मुंबईतील अनेक गावे विभागली गेली. त्यांना जोडण्यासाठी पूल बांधण्यात आले, मात्र नेरुळ पूर्व-पश्चिम जोडणारा पूल मात्र गेली १३ वर्षे पाठपुरावा करुनही कागदावरच आहे.

नेरुळकरांना पूर्व व पश्चिम जाण्यासाठी सेक्टर दोनजवळील राजीव गांधी उड्डाणपुलाचा किंवा सीवूड्स रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या उड्डाणपुलाचा वापर करावा लागत आहे. दोन्ही पुलांमधील अंतर जास्त असल्याने मोठा वळसा घालून जावे लागते. त्यामुळे माजी नगरसेविका निर्मला गावडे यांनी नेरुळ रेल्वेस्थानक परिसरात पूर्वेकडील आयुक्त निवास ते पश्चिमेकडील तेरणा कॉलेजजवळील नेरुळ सेक्टर २८ जोडणारा उड्डाणपूल बांधण्याची मागणी पालिकेकडे केली होती. या प्रस्ताव मंजूर होऊन १३ वर्षे झाली, तो कागदावरच आहे.

नेरुळ हे नवी मुंबईतील विस्ताराने व लोकसंख्येने मोठे उपनगर. त्यामुळे या उपनगराच्या विस्तारामुळे तेवढीच दळणवळणाची आवश्यकता आहे. सुरुवातीला रेल्वे स्थानक परिसरात विस्तारले नेरुळ आता सीवूड्स सेक्टर ५०, एनआरआय कॉम्प्लेक्सपर्यंत भाग विस्तारले आहे. नवी मुंबईतील चांगल्या वास्तव्यासाठी नागरिक या विभागाला पसंती देत आहेत. त्यामुळे येथील लोकसंख्याही झपाटय़ाने वाढली आहे. सातत्याने वाहनांची वर्दळ या भागात अधिक पाहायला मिळते. सीवूड्स स्थानकाच्या निर्मितीनंतर सीवूड्स पूर्व, पश्चिम भागाचा विकास झपाटय़ाने वाढला. नेरुळ व सीवूड्स स्थानकाच्या पूर्वेला शीव-पनवेल महामार्ग तर पश्चिमेला पामबीच मार्ग. त्यामुळे वर्दळीच्या या परिसरात नागरिकांना पूर्व-पश्चिमेला जाण्यासाठी सीवूड्स दारावे येथे रेल्वेफाटक होते. परंतू उड्डाणपूल झाल्यानंतर हे फाटक बंद केले. त्यामुळे रहिवाशांना मोठा वळसा घालून पूर्वेकडून पश्चिमेला जावे लागते.

मी रेल्वेकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. परंतु प्रशासनाला याचे काही सोयरसुतक नाही. पालिका अधिकाऱ्यांना कोणाचा  राजकीय दबाव आहे की काय? अशी शंका वाटत आहे.

– अशोक गावडे, माजी उपमहापौर

या पुलाबाबत नुकतीच माहिती घेतली आहे. याबाबत पूर्ण सविस्तर माहिती घेऊ न या कामाबाबत तोडगा काढू. याबाबत आयुक्तांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल.

– सुरेंद्र पाटील, शहर अभियंता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nerul on the east west link setu only on paper

ताज्या बातम्या