नवी मुंबईत बुधवारी १२ नवीन करोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील करोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ८५ वर गेली आहे, तर पनवेलमध्ये एका गर्भवती महिलेला संसर्ग झाला आहे.

महापे येथील अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या बँकिंगशी संबंधित आयटी कंपनीतील १९ कर्मचाऱ्यांची करोना चाचणी बुधवारी सकारात्मक आली आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात भीतीचे वातावरण आहे. १९ करोनाबाधित कर्मचाऱ्यांपैकी ८ जण हे नवी मुंबईतील रहिवासी आहेत. तसेच तुर्भे सेक्टर २१ येथील घरकाम करणाऱ्या एका महिलेसह कोपरखैरणे सेक्टर १९ व सेक्टर ७ येथील चार जणांच्या करोना चाचण्या सकारात्मक आल्या आहेत.

महापे एमआयडीसीतील अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या एका कंपनीतील १९ जणांची करोनाची चाचणी सकारात्मक आली आहे. या कंपनीने कोणतेही नियमांचे उल्लंघन केले असले तर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.

पनवेलमध्ये गर्भवती महिलेला लागण

पनवेलमध्ये बुधवारी एका गर्भवती महिलेला करोनाची बाधा झाली असून सध्या पालिका क्षेत्रातील करोनाबाधितांची संख्या ४० वर पोहोचली आहे. तर १४ रुग्ण बरे झाले आहेत. अद्याप २७ संशयितांच्या नमुन्यांचा अहवाल पालिकेकडे प्राप्त झालेला नाही.