लोकसत्ता टीम

पनवेल : पनवेलमधील बैलगाडा शर्यतीमध्ये गोळीबार केल्यामुळे पोलीसांनी कारवाई केल्यामुळे राहुल पाटील व त्याच्या सहकाऱ्यांना कारागृहात रहावे लागल्याची घटना ताजी असताना आठवड्याच्या रविवारी नेरे येथे बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी चार वाजता या शर्यतींच्या सामन्यादरम्यान ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ ढोकेगाव येथील जयेश जाधव हा गंभीर जखमी झाल्याची तक्रार पोलिसांकडे आल्यावर पोलिसांनी शर्यतीचे आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा नोंदविला आहे.

आणखी वाचा-पनवेल : पोलिसांची नाकाबंदी सुरु असल्याची सबब देऊन जेष्ठाला लुटले

पनवेल तालुक्यामध्ये दर आठवड्याला बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते. शेतकऱ्यांचा एक मोठा वर्ग त्यांच्या हातची सर्व कामे बाजूला सारुन शर्यतींचे सामने पाहण्यासाठी एकत्र येतात. यापूर्वी पनवेलच्या ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याने दोन गटात राडा झाला. आणि किरकोळ भांडणातून सुरु झालेल्या या राड्यात एका गटाने थेट गोळीबार केला. पोलिसांना याबाबत काहीच माहिती नव्हती त्यानंतर गोळीबाराची व्हीडीओ समाजमाध्यमांवर फिरू लागल्यानंतर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलीसांनी पनवेलमध्ये विना परवानगी बैलगाडा शर्यतीवर निर्बंध आणले होते. पनवेल तालुका पोलीसांनी याबाबत रितसर गुन्हा नोंदविला आहे.