पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात ३३ अवैध फलक मागील अनेक महिन्यांपासून आणि वर्षांपासून उभारले होते. यापूर्वीच्या महापालिका प्रशासनाने याबाबत कोणतीही भूमिका न घेतल्याने अवैध फलकांमुळे महापालिकेचा मोठा महसूल बुडाला आहे. मुंबई येथील फलकाच्या दुर्घटनेतील जीवितहानीनंतर फलकांचे तोडकाम पनवेल महापालिकेने हाती घेतले आहे. 

पनवेल महापालिकेमध्ये पालिकेने परवानगी दिलेले आणि पालिकेची परवानगी घेतल्यावर त्या परवानगीची नुतनीकरणाची मुदत संपलेले, स्ट्रक्चरल ऑडीट न केलेले असे ८७ फलक पालिका क्षेत्रात आहेत. या फलकांना पालिका उपायुक्त मारुती गायकवाड यांनी नोटीस बजावून सात दिवसात फलक उभारलेल्या कंपन्या अथवा खासगी व्यक्तींनी पुढील सात दिवसात फलकाच्या मनोऱ्याचे स्ट्रक्चरल ऑडीट अहवाल व्हीजेटीआयकडून सादर करण्याची सूचना केली आहे. या दरम्यान पालिकेने सर्वेक्षण करुन पालिका क्षेत्रात किती अवैध फलक आहेत याची माहिती घेतली.

हेही वाचा…नवी मुंबई: सकाळच्या प्रहरात अनेक ठिकाणी मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद 

पालिकेच्या सर्वेक्षणात ३३ फलक हे विना परवानगी उभारण्यात आले असल्याचे निष्पन्न झाले. फलक लावणारा व्यापारी, पालिकेतील काही अधिकारी, स्थानिक गुंड आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगनमतातून हा अवैध व्यवसाय सूरु आहे. यापूर्वी सुद्धा पालिकेने अवैध फलकांवर कारवाईचा बडगा उघारला मात्र पालिकेचे वार्ड अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे अवैध फलक उभारण्यात आले होते. पालिकेचे आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या सूचनेनंतर उपायुक्त मारुती गायकवाड यांनी सोमवार ते बुधवारपर्यंत ३३ अवैध फलक तोडण्यासाठी पथक नेमले आहेत. उपायुक्त गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक अवैध फलक हे तळोजा परिसरात आहेत.