नवी मुंबई : ठाणे जिल्हा लोकसभा निवडणूक मतदान सुरु झाले असून अनेक ठिकाणी मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या पूर्वीच ऐरोलीचे आमदार गणेश नाईक हे मतदानस्थळी सह कुटुंब उपस्थित झाले होते. सकाळच्या सत्रात नाईक कुटुंबाने मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील अंतिम टप्प्यातील मतदान आज होत असून नवी मुंबईत अनेक ठिकाणच्या मतदार केंद्रावर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दुपारी अति तीव्र उन्हाच्या झळा लागत असल्याने सकाळी सकाळी मतदान करावे या हेतूने अनेक जण आलेले आहेत. ठाणे लोकसभा मतदार संघात एकूण २५ लाख ८ हजार ७१ मतदार असून त्यात महिला ११ लाख ५९ हजार दोन आणि पुरुष मतदार १३ लाख ४८ हजार १६३ मतदार असून या शिवाय २०७ तृतीय पंथी तर ७०० सेवा मतदार आहेत.

हेही वाचा : लोखंड पोलाद बाजारातील गोदामात गुटख्याची साठवणूक

नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदार संघापैकी ऐरोलीत ४ लाख ५७ हजार ६११ एकूण मतदार असून त्यात २ लक्ष ५७ हजार ६११ पुरुष तर १ लाख ९९ हजार ७१५ महिला मतदार आहेत याशिवाय १३० तृतीयपंथी आणि १५५ सेवा मतदार आहेत. तर बेलापूर विधानसभा मतदार संघात  ३ लाख ९७ हजार ८५५ एकूण मतदार असून २ लाख १२ हजार ८९६ पुरुष तर १ लाख ८४ हजार ८१७ महिला मतदार आहेत. १८ तृतीयपंथी आणि १२४ सेवा मतदार आहेत.