नवी मुंबईतील सिडकोच्या बैठय़ा घरांसमोर असलेल्या मोकळ्या जागेत पेव्हर ब्लॉकची कामे पुन्हा सुरू करण्यात यावीत, असा आग्रह नगरसेवकांनी सुरू केला आहे. ही जमीन कंडोनियमच्या मालकीची नसून सिडको अर्थात राज्य शासनाच्या मालकीची असल्याने अशी कामे करण्यास हरकत नसल्याची नगरसेवकांची भूमिका आहे. पालिकेने कंडोनियममध्ये केलेल्या अशा कामांवर देशाच्या महालेखापरीक्षकांनी ताशेरे ओढले होते. त्यामुळे पालिकेने अशी कामे करण्याचे बंद केले होते.
नवी मुंबईत सिडकोने अत्यल्प तसेच अल्प उत्पन्न गटासाठी ६४ हजार घरे बांधली आहेत. बैठय़ा घरांच्या समूहाला या ठिकाणी कंडोनियमचा दर्जा देण्यात आला असून त्यांच्या असोसिएशनला मासिक देखभाल खर्च वसूल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. हा देखभाल खर्च रहिवासी अल्प व अत्यल्प उत्पन्न गटातील असल्याने कमी ठेवले जात आहेत.
महिन्याला जमा होणाऱ्या या शुल्कातून कंडोनियममधील नागरी सुविद्या व स्वच्छता करणे या कंडोनियमच्या असोसिएशनला शक्य नाही. त्यामुळे या कंडोनियमच्या प्रभागातून निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्या आग्रहास्तव पालिकेने या कंडोनियममधील गटार, पाणी, उद्यान, समाज मंदिर आणि विद्युत अशी अनेक कामे केली आहेत. ही कामे करताना कंडोनियमच्या परिसरात पेव्हर ब्लॉकदेखील बसविण्यात आले आहेत. त्यामुळे नवी मुंबईत बघावे तिकडे पेव्हर ब्लॉक लावण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यानंतर पेव्हर ब्लॉकचे हे ‘फिव्हर’ खासगी सोसायटय़ांपर्यंत गेले. यावर झालेल्या कोटय़वधी रुपयांच्या खर्चावर देशाच्या महालेखापरीक्षकांनी सन २००० मध्ये आक्षेप घेतला. त्यामुळे ही कामे नंतर बंद करण्यात आली. त्यानंतर २००१ मध्ये आलेल्या आयुक्त पी. एस. मिना यांनी ही कामे पुन्हा सुरू केली, मात्र त्यांच्या पश्चात ठप्प झालेली ही कामे आजतागायत बंद आहेत. नवी मुंबईतील जमीन आजही सिडकोच्या मालकीची असून ती केवळ साठ वर्षांच्या भाडेपट्टय़ावर रहिवाशांना देण्यात आली
आहे. त्यामुळे एका अर्थाने ही सर्व जमीन शासनाच्या मालकीची असून पालिका ही निमशासकीय प्राधिकरण असल्याने शासनाच्या जमिनीवर निमशासकीय यंत्रणेने लोकाग्रहास्तव कामे करणे गैर नाही. असा युक्तिवाद वाशीतील नगरसेवक किशोर पाटकर यांनी शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत केला. ही बाब शासन किंवा महालेखापरीक्षकांच्या निर्देशनास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिलेली नाही. त्यामुळे पालिकेतील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे गरीब गरजू रहिवाशांच्या घरासमोरील नागरी कामे आज होत नाहीत असे ते म्हणाले.