शेकापची मोर्चातून पक्षबांधणी

शेकापने मंगळवारी शक्तिप्रदर्शन करत सामान्यांच्या हक्कांसाठी नवीन पनवेल येथील सिडको कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते.

पनवेल नगर परिषदेमधील शेतकरी कामगार पक्षाचे दोन नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असून भाजपच्या एका कार्यक्रमात या नगरसेवकांनी उपस्थिती लावल्याने चर्चेला उधाण आले आहे. या पाश्र्वभूमीवर आणखी पडझड होऊ नये यासाठी शेकापने संघटना बांधणीकडे लक्ष दिले आहे. शेकापने मंगळवारी शक्तिप्रदर्शन करत सामान्यांच्या हक्कांसाठी नवीन पनवेल येथील सिडको कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये झोपडपट्टीवासीय मोठय़ा संख्येने सामील झाले होते. नवीन पनवेल वसाहतीमधील सेक्टर ७ ते सिडको कार्यालयादरम्यान हा मोर्चा काढण्यात आला. खांदेश्वर व नवीन पनवेल येथील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करावे, सिडकोने बांधलेल्या इमारतींचे पुनर्वसन करण्याचा खर्च सिडकोने द्यावा, स्मार्ट सिटीची घोषणा करणाऱ्या प्राधिकरणाने सुरुवातीला चोवीस तास पाणीपुरवठा करावा, सार्वजनिक स्वच्छतागृहे, उद्याने, शाळांनी बंद केलेले मैदानांचे दरवाजे तरुणांसाठी खुले करावेत, सायन-पनवेल मार्गावर खांदेश्वर वसाहतीच्या प्रवेशद्वारावर उड्डाणपूल बांधावा, धार्मिक स्थळे नियमित करावीत, सिडको वसाहतींच्या परिक्षेत्रात सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत, वाहनतळे विकसित करावीत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. माजी आमदार विवेक पाटील यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Peasants and workers party protest in panvel