पनवेल महापालिकेसाठी आज मतदान; ७८ जागांसाठी ४१८ उमेदवार रिंगणात

पनवेल महापालिकेत स्वत:चे स्थान निश्चित करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य बुधवारी मतदानयंत्रात बंद होणार आहे. पाच वर्षांसाठी कोणाला संधी द्यायची आणि कोणाला नाकारायची हे ठरवण्याची संधी आज पनवेलकरांना मिळणार असल्यामुळे ‘आजि मतदारांचा दिनु’ असणार आहे. २० प्रभागांतील ७८ जागांसाठी ४१८ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस, महापालिका प्रशासन आणि निवडणूक आयोगाने शक्य त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत.

४ लाख २५  हजार ४५३ मतदारांना उद्या पनवेलचे भवितव्य ठरवण्याची संधी मिळणार आहे. २ लाख २८ हजार ६७४ पुरुष मतदार आणि १ लाख ९६ हजार ७९० महिला मतदार आहेत. ११० शाळांमध्ये असलेल्या ५७० मतदान केंद्रांवर ४००० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अनुचित प्रकारांमुळे पोलीस सावध झाले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस कर्मचारी तैनात असणार आहे. २० प्रभागांकरिता ४ रुग्णवाहिका पुरविण्यात येणार आहेत.

४ भरारी पथके तैनात

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी आणि पालिकेचे कर्मचारी यांची चार भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. खारघर ते पनवेल या परिसरात ही पथके गस्त घालणार आहेत. दोन दिवस मद्यविक्रीवर बंदी आहे, त्यामुळे अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यात येणार आहे.

४० हजार रुपये जप्त

खिडुकपाडा गावात सोमवारी मध्यरात्री पोलिसांना पाकिटांमध्ये भरलेल्या २ हजार रुपयांच्या नवीन नोटा सापडल्या. ही रक्कम ४० हजार एवढी आहे. मतांसाठी लक्ष्मीदर्शन घडवले जात असलेल्या चर्चेला, या कारवाईमुळे पुष्टी मिळाली आहे. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. खिडुकपाडा येथील शिवसेनेच्या उमेदवार सीमा उलवेकर यांचे पती नरेश यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपेरे यांनी दिली.

उमेदवार शेर, मतदार सव्वाशेर

पनवेल : निवडणुका जाहीर होताच लोकहिताचे सोंग घेऊन पाकिटे वाटून मतदारांना खरेदी करू पाहणाऱ्या उमेदवारांना धडा शिकवण्याचा निर्णय पनवेलमधील अनेक मतदारांनी घेतला आहे. प्रत्येकाचे पाकीट घ्यायचे आणि मत मात्र आपल्याला हव्या त्याच उमेदवाराला द्यायाचे, असे सूत्र अवलंबण्याचे त्यांनी ठरवले आहे. आज दारी आलेले उमेदवार पुढे पाच वर्षे दिसणारच नसल्याची खात्री असल्याने त्यांनी हे धोरण अवलंबले असल्याचे सांगितले जात आहे.  पनवेलच्या प्रत्येक मतदाराला चार उमेदवार निवडून देता येणार आहेत. आजवर सामान्यपणे एका मतासाठी ५०० रुपये दिले जात, मात्र या निवडणुकीत चार बटने दाबावी लागणार असल्यामुळे ५०० रुपयांत मतदारांना खूश करणे उमेदवारांसाठी अशक्य ठरले आहे. प्रत्येक मतदाराची किंमत दोन हजारांच्या घरात पोहोचली आहे. ही किंमत पाकिटात घालून मतदारांच्या घरी पोहोचती केली जात असल्याची चर्चा आहे.

देशात गुप्त मतदानपद्धत असली, तरीही उमेदवारांना लक्ष्मीदर्शन घडवताना आम्ही याच उमेदवाराला मत देऊ अशी शपथ घेण्यास मतदारांना भाग पाडले जात आहे. अमुक चिन्ह असणारीच बटने दाबा, असे मतदारांच्या मनावर बिंबवले जात आहे. पैसे घेणाऱ्यांनी स्वाक्षरी करावी, अशी अट काही उमेदवारांच्या प्रतिनिधींनी घातली होती, मात्र मतदारांनी ती धुडकावून लावल्याचे कळते.

सुट्टीत गावी गेलेल्या मतदारांनी निवडणूक काळात तब्बल चार ते सहा हजारांची कमाई करण्याची संधी हातची निसटू नये म्हणून पनवेल गाठल्याची चर्चा आहे. त्यांना आणण्या-सोडण्याचीही सोय राजकीय पक्षांनी केली आहे.

यादीत नाव शोधण्यासाठी गर्दी

मतदार यादीत नाव शोधण्यासाठी मंगळवारी अनेक पक्ष कार्यालयांत गर्दी झाली होती. ज्यांचे नाव मतदार यादीत आहे, अशांनाच उमेदवारांची खास माणसे लक्ष्मीदर्शन घडवत असल्याची चर्चा असून आपापली नावे शोधण्यासाठी ही गर्दी असल्याची चर्चा परिसरात आहे. ज्यांचे नाव यादीत नाही, त्यांना सहा हजारांवर पाणी सोडावे लागणार आहे.

बिर्याणी, कोंबडीचा रस्सा, भाकरी

पनवेल : मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहन, सामिष भोजन आणि मत दिल्याबद्दल पाकीट.. उद्याचा एक दिवस मतदारराज झाल्याचा आभास मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्याही मनात निर्माण व्हावा, यासाठी पनवेलमधील सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. बुधवार म्हणजेच मांसाहाराच्या दिवशी मतदान होणार असल्यामुळे बहुतेक उमेदवारांनी मतदार आणि कार्यकर्त्यांसाठी बिर्याणीचा बेत आखला आहे. याव्यतिरिक्त कोंबडीचा रस्सा आणि तांदळाच्या भाकऱ्याही मागवण्यात आल्या आहेत.

२० प्रभागांमध्ये ४१८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वाधिक उमेदवार प्रभाग आठमध्ये आहेत. तसेच कळंबोली परिसरातील सहा क्रमांकाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये सर्वाधिक १०७ उमेदवार आहेत. याच निवडणूक निर्णय कार्यालयावर सर्वाधिक ताण येणार असल्याचे समजते. कळंबोली, कामोठे, खारघर, नवीन पनवेल या सिडको वसाहतींमध्ये पालिकेची पहिलीच निवडणूक होत असल्यामुळे येथे तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. खर्च करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला खतपाणी घालण्यासाठी उमेदवारांनी बिर्याणीची मेजवानी देण्यास प्राधान्य दिले आहे.

नवीन पनवेल येथील ‘आई कॅटर्स’चे मालक प्रमोद देसाई यांनी सांगितले की, ‘विविध पक्षांच्या उमेदवारांनी जेवणाची ऑर्डर दिली आहे. तीनशे रुपयांत एक किलो चिकन बिर्याणी बनवून दिली जाणार आहे. यामध्ये दहा व्यक्ती पोटभर जेऊ शकतात. त्यामुळे किमान सहा महिलांना रोजगार मिळणार आहे. येणाऱ्या ऑर्डरच्या प्रमाणात कोंबडय़ांची ऑर्डर दिली जाणार आहे.’

विविध खानावळींनाही ऑर्डर देण्यात आल्या आहेत. आगरी पद्धतीचा कोंबडीचा रस्सा व तांदळाच्या भाकऱ्यांची ऑर्डरही काही राजकीय पक्षांच्या कार्यालयातून देण्यात आल्याचे समजते. उद्याचा दिवस खर्च केल्यानंतर पुढे पाच वर्षे चिंता नसल्याचे गृहीत धरून उमेदवारांनीही ‘होऊ द्या खर्च’ असा बाणा अवलंबला आहे.