संघर्ष समितीचा ३ मे रोजी मोर्चा काढण्याचा निर्धार
राज्याच्या पर्यावरण राज्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही तळोजातील प्रदूषण कमी झालेले नाही. ‘मुंबई वेस्ट मॅनेजमेंट’ या कंपनीचे दुसऱ्या टप्प्यातील नवीन प्रकल्पाचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांनी दोन महिन्यांपासून या प्रकल्पाविरोधात आंदोलन उभारले आहे. या आंदोलनाचा प्रश्न विधिमंडळात मंगळवारी मांडण्यात आला आहे. कंपनीचा नवीन प्रकल्पाचे काम त्वरित थांबवावे, तसेच जुन्या प्रकल्पातून होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना होत नाहीत तोवर या प्रकल्पाचे काम सुरू करू नये, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात केली. मंगळवारी आमदार ठाकुरांनी तळोजा येथील कंपनीमुळे प्रदूषणाची समस्या निर्माण झाल्याचे सांगत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला.
कंपनीच्या नवीन प्रकल्पाचे काम बंद पाडण्यासाठी तळोजा पंचक्रोशीतील ग्रामस्थ ३ मे रोजी मोर्चा काढणार असल्याचे संघर्ष समितीने जाहीर केले. आमदार ठाकूर हे आंदोलनात सहभागी होणार आहेत. यात शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळाराम पाटील ग्रामस्थांच्या लढय़ात सहभागी होतील.
तळोजा परिसरात आजही मोठय़ा प्रमाणात वायू आणि जलप्रदूषण सुरू आहे. असल्याचे येथील ग्रामस्थांचे मत आहे. मंत्री पोटे यांनीच या संदर्भात पाठपुरावा न केल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांनी या कंपन्यांवर मेहेरनजर असल्याचा आरोप आंदोलकांचे नेते बाळाराम पाटील यांनी केला आहे. प्रदूषण रोखणे अपेक्षित असताना कंपनी मोठय़ा प्रमाणात पर्यावरणाची हानी करीत आहे, असा आरोप ठाकूर यांनी केला. कंपनीच्या जुन्या प्रकल्पामधून होणाऱ्या प्रदूषणामुळे येथील ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्न आणि नैसर्गिक संसाधनांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असताना नवीन प्रकल्पाला कोणत्या आधारावर कोणी व का परवानगी दिली असा प्रश्न ग्रामस्थांच्या वतीने काँग्रेसचे नेते सुदाम पाटील यांनी उपस्थित केला आहे.