करोनामुळे रखडलेल्या सिडकोचा महागृहनिर्मितीला गती

नवी मुंबई : करोना साथ रोगामुळे लाभार्थीना घरांचा ताबा देण्यास विलंब झाल्याने सिडकोने जुलैपासून सुरू केलेल्या ताबा कार्यक्रमा अंर्तगत करारनामे व नोंदणीची सहा हजार लाभार्थीच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यात सिडकोला यश आले आहे. आता केवळ १२२६ घरांचा ताबा देणे शिल्लक असून येत्या दहा दिवसांत हे लक्ष्य पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी टप्प्याटप्प्याने काढण्यात आलेल्या सोडतीतील ७२२६ लाभार्थीनी आतापर्यंत देखभाल व दुरुस्ती रकमेसह सर्व रक्कम भरलेली आहे.

सर्वासाठी घर योजनेअंर्तगत सिडकोने खारघर, तळोजा, घणसोली, कंळबोली, द्रोणागिरी या पाच नोडमध्ये महागृहनिर्मिती सुरू केली आहे. या महागृहनिर्मितीतील २४ हजार घरांची सोडत बांधकाम आणि सोडत एकाच वेळी या उपक्रमाअंतर्गत दोन ऑक्टोबर २०१८ पासून सुरू करण्यात आलेली आहे. सोडत काढण्यात आलेल्या २४ हजार घरांपैकी सात हजार लाभार्थी अर्ज छाननी प्रक्रियेत अपात्र ठरल्याने या सोडतीत प्रतीक्षा यादीवर असलेल्या लाभार्थीना घराचे वाटप पत्र देण्यात आलेले आहेत.

करोनाकाळात अनेक लाभार्थीचे ऐनवेळी रोजगार गेले असून काही जणांना वेतनावर संक्रात ओढवलेली आहे. त्यामुळे अनेक लाभार्थीनी सिडकोकडून मिळालेल्या घरांवर पाणी सोडले आहे. घराचे सर्व हप्ते व देखभाल दुरुस्तीसह सिडकोची रक्कम भरलेल्या लाभार्थीची संख्या सात हजार २२६ आहे. त्यापैकी सिडकोने सहा हजार लाभार्थींचे करारनामे व नोंदणी आतापर्यंत केली आहे.

कमी कालावधीमध्ये सहा हजार घरांचा ताबा देण्याची सिडकोची ही पहिलीच वेळ असून इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणात करारनामे झालेले आहेत. सिडकोच्या पणन विभागाने त्यासाठी म्हाडाने वापरलेल्या संगणक प्रणालीचा वापर केला असून पणन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यानी लाभार्थीँचे नव वर्षांपूर्वी घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे आव्हान पूर्ण केले आहे. शिल्लक एक हजार लाभार्थींना लवकरच घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून ३१ डिसेंबरपर्यंत सर्व रक्कम भरलेल्या लाभार्थींना घर देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे सिडको आता आणखी पाच हजार घरांची सोडत काढण्यासाठी सज्ज होणार आहे.