कळंबोलीतील अशुद्ध पाण्याचा प्रश्न ‘लोकसत्ता’ने मंगळवारी मांडल्यानंतर येथील रहिवाशांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. गेली सात वर्षे आम्ही पाणी उकळून पितोय, अनेक आजारांनी ग्रस्त आहोत, तरीही सिडको याची दखल घेत नाही. त्यामुळे या अशुद्ध पाण्याचे वाढीव देयक का भरायचे, असा सवालही त्यांनी केला आहे.

३० वर्षांपूर्वी या परिसरात टाकलेली पाण्याची वाहिनी जीर्ण झाल्याने मागील सात वर्षे या परिसरात अशुद्ध (मलमिश्रित) पाणीपुरवठा होत आहे. याबाबत अनेकदा सिडकोकडे तक्रारी करण्यात आल्या, मोर्चे काढले मात्र हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही दीड वर्षांपूर्वी ‘केएल वन’ येथे २५ लाख रुपये खर्च करून नवीन जलवाहिनी टाकली. यानंतर पाण्याला दुर्गंधी येणार नाही असे  वाटत होते, मात्र त्यानंतरही दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा सुरूच आहे.

कळंबोलीतील केएल वन, एलआयजी, केएल २, केएल ४, केएल ५ आणि केएल ६ या वसाहतींमध्ये सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास पाणीपुरवठा होत आहे. पाणी सकाळी सव्वासहा वाजता आल्यानंतर पहिली २० मिनिटे पाणी सोडून द्यावे लागत आहे. त्यानंतर दुर्गंधी कमी झाल्याचा आंदाज घेत पिण्यासाठी पाणी भरावे लागत आहे. या पाण्याची दुर्गंधी घरातही पसरत असल्याने ती नकोशी होत आहे. त्यामुळे सात वर्षांपासून पाणी उकळून वापरत आहोत. आमच्याकडे या पाणी समस्येमुळे पाहुणे येण्यासही टाळाटाळ करतात, अशा भावना येथील महिलांनी व्यक्त केल्या आहेत. कावीळ, साथरोगाचे रुग्ण येथे मोठय़ा प्रमाणात सापडत असल्याचे स्थानिक डॉक्टरांचेही म्हणणे आहे. त्यामुळे या दुर्गंधीयुक्त पाण्यासाठी आम्ही वाढीव शुल्क का भरावे, असा प्रश्न येथील गृहिणींनी उपस्थित केला आहे.

सलग दहा तास पाण्याचे नियोजन?

सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने ‘लोकसत्ता’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर कळंबोली वसाहतीमध्ये किमान दहा तास सलग पाणीपुरवठा करू शकतो का? याबाबत विचार करीत असल्याचे सांगितले. यामुळे सुरुवातीला नळजोडणीत उग्र दर्प येणारे आणि वाया जाणारे पाणी जलवाहिनीत थांबणार नाही. येत्या आठ दिवसात याची अंमलबजावणी होणार असल्याचे सिडकोच्या अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न  करण्याच्या अटीवर सांगितले. याचा लाभ केएल १, एलआयजीसह केएल २, केएल ४ यांना मिळेल. मात्र केएल ५ व केएल ६ येथील इमारतींच्या शेवटच्या मजल्यावर इतका वेळ त्याच दाबाने पाणीपुरवठा होईल का? याविषयी साशंकता आहे.

पाणी शुल्क भरायला विरोध नाही. मात्र किमान शुद्ध पाणी तरी मिळावे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मुखर्जी यांच्याविषयी लाखो घरे बांधणार, पाण्यासाठी धरणे खरेदी करणार असे अनेक संकल्प ऐकायला मिळतात.  हा गंभीर प्रश्न सिडको का सोडवत नाही. अधिकारी त्यांच्या कुटुंबासमवेत अशा अवस्थेत राहतील का?

– सुनीता जाधव, ‘केएल वन’, रहिवासी