scorecardresearch

मंगल कार्यालय वर्षांला एक रुपयाने देण्याचा प्रस्ताव; प्रस्तावावर पालिका सदस्यांच्या निर्णयाकडे कळंबोलीकरांचे लक्ष

सध्या कळंबोलीमध्ये मंगल कार्यालयात विवाह व इतर समारंभासाठी २० हजार रुपये भाडे आकारले जाते.

प्रतिनिधिक छायाचित्र

प्रस्तावावर पालिका सदस्यांच्या निर्णयाकडे कळंबोलीकरांचे लक्ष

पनवेल : कळंबोली गावाजवळील काळभैरव मंगल कार्यालयाचे व्यवस्थापन गावातील महिला मंडळाला वार्षिक एक रुपये भाडय़ाने नऊ वर्षांच्या करारावर देण्याचा प्रस्ताव शुक्रवारच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर मांडण्यात येणार आहे. पालिका सदस्य या प्रस्तावावर कोणता निर्णय घेतात याकडे कळंबोलीकरांचे लक्ष लागले आहे.

सध्या कळंबोलीमध्ये मंगल कार्यालयात विवाह व इतर समारंभासाठी २० हजार रुपये भाडे आकारले जाते. पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतीच्या कारभारात ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून हे मंगल कार्यालय उभारले होते. पालिका स्थापनेनंतर ग्रामपंचायतीच्या सर्व मालमत्ता ताब्यात घेऊन त्याचे भाडेदर ठरविण्यात आले. पालिकेने ठरविलेले भाडेदर हे १५ ते १७ हजारांपुढे असल्याने ग्रामस्थांनी बांधलेल्या मंगल कार्यालयात कार्यक्रमांसाठी अधिकची रक्कम भरावी लागत होती. महिलांना हळदीकुंकूसारख्या कार्यक्रमांसाठी अधिकचे भाडे मागितले जात होते. याच गावातील शेकापचे नगरसेवक रवींद्र भगत यांनी या प्रश्नावर अनेक वर्षे उपोषण व आंदोलने करून पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले.

 शेकापचे नगरसेवक गोपाळ भगत, राष्ट्रवादीचे नगरसेवक विजय खानावकर हेसुद्धा याच गावचे रहिवासी असल्याने त्यांनीही हीच मागणी लावून धरली. अखेर पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेसमोर मांडल्यानंतर पालिकेची एकहाती सत्ता असलेल्या भाजपचे पालिका सदस्य यावर कोणती भूमिका घेतात याकडे सर्व कळंबोली ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. सध्या कळंबोलीत विवाहासाठी मंगल कार्यालय भाडय़ावर घेण्यासाठी २५ ते ४० हजार रुपये मोजावे लागतात. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नाममात्र दरात कळंबोलीवासीयांना मंगल कार्यालय मिळणार आहे.

पालिका सदस्यांच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावा लागणार आहे. विशेष म्हणजे पालिका क्षेत्रातील विविध २९  गावांमधील अशाच प्रकारच्या ग्रामपंचायतीने बांधलेल्या पूर्वाश्रमीच्या मंगल कार्यालयांचा ताबा तेथील स्थानिक महिला बचतगट व समाजिक मंडळांना व्यवस्थापनासाठी देण्याची मागणी यापूर्वी सर्वसाधारण सभेत सदस्यांनी केली होती.

सभागृहाने ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून हा प्रस्ताव मंजूर करावा हीच कळंबोलीकरांची मागणी आहे. ज्या महिला व ग्रामस्थांनी हे सभागृह बांधण्यासाठी श्रमदान केले, त्यावेळी लोकवर्गणी दिली असून त्यांच्या भावना या मंगल कार्यालयाशी जोडल्या गेल्या आहेत. काळभैरव मंगल कार्यालय हे कळंबोली गावाची एक अस्मिता आहे. मला खात्री आहे लोकआग्रहाच्या या प्रस्तावाला सर्वच पालिका सदस्य मंजुरी देऊन त्यांचा मोठेपणा दाखवतील. 

– रवींद्र भगत, नगरसेवक, शेकाप

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Proposal to pay mars office for one rupee per year akp

ताज्या बातम्या