पनवेल ः तळोजा वसाहतीमधील फेस २ येथे सोमवारी मध्यरात्री उग्रदर्प येऊ लागल्याने रहिवाशी हैराण झाले. तळोजा औद्योगिक वसाहतीलगत ही नागरी वसाहत सिडको महामंडळाने वसविल्याने रहिवाशांना मागील अनेक वर्षात वारंवार उग्रदर्पाचा त्रास जाणवतो. परंतु हा उग्रदर्प कोण पसरवतो याचा शोध महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अद्याप लावू शकले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तळोजा वसाहतीमधील सिडको मंडळाने बांधलेल्या केदार या गृहनिर्माण संस्थेमध्ये राहणारे राजीव सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री रासायनिक वायूमुळे तळोजा फेस १ आणि २ मधील नागरिक दर्प घरातील खिडक्यांमधून येऊ लागल्याने हैराण झाले होते. हा दर्प मलमूत्र आणि डोळ्यांमध्ये जळजळ होत असल्याने वायू गळती झाली, असा संशय अनेक रहिवाशांनी व्यक्त केला. मात्र मध्यरात्रीनंतर काही तासांनी हा दर्प आपोआप बंद झाला. यापूर्वीही अनेकदा असा दर्प वसाहतीमध्ये आल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रासायनिक कारखाने आणि नागरी वसाहत यामध्ये ७०० मीटरपेक्षा अधिकच्या नाविकास क्षेत्र राखीव ठेऊन त्यात हरितपट्टे उभे करणे गरजेचे होते. त्यानंतर इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र दिल्यानंतर ही वसाहत नागरीकांच्या आरोग्यासाठी सुरक्षित झाली असती. मात्र औद्योगिक वसाहतीला खेटून तळोजा नागरी वसाहत बांधली जात असल्याने अगोदर नागरी वस्ती त्यानंतर बफरझोनमधील हरितपट्टा असे धोरण नागरी वसाहत उभारणाऱ्यांनी अवलंबल्याचे दिसत आहे. तळोजा वसाहतीमध्ये ५० हजारांहून अधिक घरांचे बांधकाम सुरु आहे. बांधकामातील धुळीसह रासायनिक वायूतून निघणाऱ्या दर्पाचा त्रास सहन करुन येथे रहिवाशी राहतात. या वसाहतीमध्ये पनवेल महापालिकेचा आरोग्य दवाखाना नसल्याने वसाहतीमध्ये श्वसनदाह रुग्ण किती याची संख्या पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे अद्याप नोंदविली गेली नाही. सिडको मंडळाने पाच गाळे दवाखान्यांसाठी देण्याचे मंजूर केले असले तरी या गाळ्यांना लागणारी किती रक्कम पनवेल पालिकेने द्यावी याबाबत अद्याप सिडको मंडळाने पनवेल पालिकेला कळविले नाही. त्यामुळे पनवेल पालिकेचे तळोजा वसाहतीमध्ये दवाखाने सुरु करण्याचे काम थांबले आहे.

हेही वाचा – नवी मुंबईत उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई ? पाणी उपशामुळे मोरबे धरण जलसाठ्यात वेगाने घट

नेमका दर्प आला कुठून एमपीसीबीचे तळोजा वसाहत ज्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात येते ते अधिकारी म्हणतात आमच्या हद्दीतील कारखान्यांची सोमवारी मध्यरात्रीच चौकशी केल्यावर संबंधित कारखान्यांमधून हे प्रदूषण झाले नाही. तळोजातील वायू निर्देशांक यंत्रातही प्रदूषणाची नोंद सापडली नाही. मात्र तळोजा वसाहतीमध्ये आलेला दर्प नागरिकांची घुसमट करणारा होता. हा दर्प आला कुठून हा प्रश्न अनुत्तरीत आहे. एमपीसीबीचे इतर परिसरावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी या सर्व प्रकाराविषयी अनभिज्ञ आहेत. एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांच्या हद्दीच्या वादामुळे प्रदूषण करणाऱ्यांचे फावते. रायगड ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर तळोजा औद्योगिक वसाहत आहे. याच हद्दीचा वाद संपविल्यास आणि दिवसरात्र एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांची गस्त नेमल्यास प्रदूषण करणाऱ्यांना चाप बसू शकेल. औद्योगिक वसाहतीच्या परिसराबाहेर टॅंकर धुणाऱ्यांचा आणि इतर ठिकाणांहून घातक रसायनांचे टॅंकर या परिसरात गटारात, नाल्यात व खाडीक्षेत्रात सोडणाऱ्यांच्या अवैध व्यवसायाला याच हद्दीच्या वादामुळे अप्रत्यक्ष मदत होत आहे. हा अवैध व्यवसाय उद्ध्वस्त करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांचे एकत्रित टास्कफोर्स नेमण्याची गरज आहे. एमपीसीबीच्या मुख्य सचिवांनी यासाठी निर्देश देण्याची वेळ आली आहे. प्रदूषण करणाऱ्यांना पकडल्यानंतर त्यांना न्यायालयात कठोर शासन होणे तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी विधिमंडळातील सदस्यांनी याविषयी कायदा अजून कठोर करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा – बारवीच्या पाण्याची प्रतीक्षाच, बारवी विस्तारीकरण योजनेतील कामे पूर्ण होईपर्यंत पुरवठा अशक्य

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये एमपीसीबीचे दोन फील्ड अधिकारी सोमवारी गस्तीवर होते. कुठल्याही कंपनीमधून वायूगळती झाली नव्हती. एमपीसीबी अधिकाऱ्यांची रात्रगस्त नवरात्रीपासून सुरु आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या कंपन्यांना उचित निर्देश दिले जातात. तोंडरे गावामध्ये एमपीसीबीचे वायू निर्देशांक यंत्र असून यामध्ये सोमवारी मध्यरात्री प्रदूषणाची कोणतीही नोंद झाली नाही. – विक्रांत वाघमारे, उपप्रादेशिक अधिकारी, तळोजा एमपीसीबी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Residents of phase 2 in taloja colony were shocked after the strong smell started on monday midnight ssb
Show comments