चोऱ्या व वाद वाढत असल्याने कारवाईची मागणी

नवी मुंबई : शहरातील गावठाण भागात बेकायदा झोपडपट्टी वाढत असताना आता यात थांटलेल्या भंगार दुकानांमुळे नागिरकांना अनेक समस्या निमार्ण होत आहेत. यामुळे चोऱ्यांचे प्रमाणही वाढल्याच्या तक्रारी असून यावर कारवाईची मागणी होत आहे.

 शहरात दिवाळेपासून ते दिघापर्यंत अनेक गावे आहेत. या मूळ गावठाणांभोवती बेकायदा झोपडय़ा वसलेल्या आहेत. यात आता बेकायदा भंगारच्या दुकानांचा वेढा वाढत आहे. यात चोरीचे सामान येथे आणून विकले जात आहे. त्यातूनच अनेक वेळा वादाचे प्रसंगही होत आहेत. ही बेकायदेशीर भंगार दुकाने  गुन्हेगारीचे ठिकाण बनू लागली आहेत. तुर्भे परिसरात घडलेले तिहेरी हत्याकांड हे त्याचेच एक उदाहरण आहे. एमआयडीसी परिसरातत असलेल्या अनेक बंद कंपन्यांच्या ठिकाणी भंगार माफियांनी आपले बस्तान बसवले आहे. तर गावांभोवती असलेल्या दुकानांमध्ये हा चोरीचा माल विक्री केला जात आहे. ठरावीक भाडे घेऊन बेकायदा बसवलेल्या भंगार दुकानांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. परंतु पालिका याकडे दुर्लक्ष करत आहे.

बेकायदा भंगारवाल्यांची दुकाने शहरासाठी त्रासदायक ठरू लागली आहेत. याबाबत पोलिसांना विचारणा केली असता  शहरातील भंगारवाल्यांची माहिती घेऊन लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

नवी मुंबई शहरात गावठाणांभोवती असलेल्या बेकायदा भंगारवाल्यांमुळे अस्वच्छतेत बाधा येते. याबाबत पालिका योग्य ती कार्यवाही करेल. संबंधित स्वच्छता निरीक्षकांना याबाबत योग्य त्या सूचना देण्यात  येतील.

बाबासाहेब राजळे, उपायुक्त ,घनकचरा व्यवस्थापन विभाग

गावांभोवती भंगारवाल्यांची दुकाने वाढली आहेत. भुरटे चोर सोसायटय़ांमध्ये येऊन घराबाहेरील वस्तू चोरतात.सीसीटीव्ही यंत्रणेची चोरी होत आहे. पालिका व पोलीसांनी त्यांच्यावर कारवाई करावी

 –विश्वनाथ काकडे सीवूड्स

गावांभोवती  व उड्डाणपुलाखाली बेकायदा झोपडय़ा झाल्या असून त्यातील भुरटे चोरटे घरासमोरील महागडय़ा वस्तू तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांच्या बॅटरी काढून विकत आहेत. त्यामुळे पालिका व पोलिसांनी तत्काळ कारवाई करायला हवी. याबाबत मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात आली आहे.

राजेश पाटील,आग्रोळी गाव