गोदामांच्या आगीमुळे ग्रामस्थांची सुरक्षा ऐरणीवर

शनिवारी उरणमधील दिघोडे गावाजवळ असलेल्या ‘डब्ल्यू वेअरहाऊस’ या गोदामाला भीषण आग लागली. त्यानंतर झालेल्या स्फोटामुळे व प्रदूषणाने येथील ग्रामस्थांच्या सुरक्षेचाच प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात सध्या अनेक गोदाम उभारली जात असून त्यामुळे गावातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या गोदामात साठविण्यात येणाऱ्या वस्तू व त्यासाठीची सुरक्षा व्यवस्थेची माहिती देण्याची मागणी करूनही ती ग्रामपंचायतीला दिली जात नाही. वर्षभरात आशा आगीच्या सहा घटना घडल्या आहेत.

उरण परिसरात जेएनपीटी बंदरातून आयात व निर्यात होणाऱ्या मालाची साठवणूक करणारे ६४ पेक्षा अधिक गोदामे आहेत. यातील बहुतांशी गोदामे ही खासगी आहेत. त्यामुळे या गोदामातून अनेक प्रकारच्या ज्वलनशील, रासायनिक पदार्थाची साठवणूक नियम डावलून केली जात आहे. त्यामुळे आगीच्या धोकादायक घटना घडत आहेत. अशा घटनांमुळे येथील रहिवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

दिघोडे येथे झालेल्या घटनेपूर्वी वेश्वी व चिर्ले या गावांच्या परिसरात गोदामांना भीषण आग लागलेली होती. या आगीमुळे जळालेल्या रसायनांचा परिणाम येथील नागरिकांना सहन करावा लागला आहे. या संदर्भात परवानगी दिली जात आहे का? या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे विचारणा केली असता त्याचे स्पष्ट उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले नव्हते. तर दिघोडे येथील घटनेची माहिती विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी राहुल मोटे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. तर या आगीच्या घटनेचा पंचनाम महसूल विभागाकडून केलेला असून पोलिसांकडून आगीचे कारण काय, याचा अहवाल आलेला नसल्याचे उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांनी दिली. तर उरणमध्ये वारंवार लागणाऱ्या गोदामाच्या आगी या संशयास्पद असल्याची चर्चा आहे.

अतिज्वलनशील पदार्थाची हाताळणी

दिघोडे ग्रामपंचायतीकडून डब्ल्यू वेअरहाऊसच्या मालकाला ग्रामपंचायतीकडून वारंवार पत्र पाठवून गोदामात कोणती सुरक्षा व्यवस्था आहे, याची माहिती देण्याची सूचना करूनही ती दिली जात नसल्याचे दिघोडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनिया घरत यांनी सांगितले. तर या भागात असलेल्या अनेक गोदामांत अतिज्वलनशील पदार्थाची धोकादायक हाताळणी केली जात असल्याचे मत येथील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांनी दिली.