कुटुंबसंकुल : शांतता आणि स्वच्छतेचे ‘दूत’

नवी मुंबईत तेही ऐरोलीत घर घेण्यासाठी सुरुवातीला कोणी पुढाकार घेत नव्हतं ही वस्तुस्थिती आहे.

स्वच्छता हा शांतिदूत संकुलाचा लौकिक आहे. संकुलात नियमित कीटकनाशक फवारणी करण्यात येते. ‘स्वच्छ नवी मुंबई, हरित नवी मुंबई’ हे ब्रीद कायम ठेवत संकुलात अशोका, नारळ, बदाम आणि उंबर आदी झाडे लावण्यात आली आहेत. पाण्याची उत्तम सुविधा. पाण्याच्या टाक्यांची दर सहा महिन्यांनी त्यांची स्वच्छता केली जाते.

शांतिदूत अपार्टमेंट, सेक्टर- ५ ऐरोली

नवी मुंबईत तेही ऐरोलीत घर घेण्यासाठी सुरुवातीला कोणी पुढाकार घेत नव्हतं ही वस्तुस्थिती आहे. दळवळणाची अपुरी साधने आणि जी उपलब्ध साधने आहेत, त्यातून प्रवास करताना त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे नवी मुंबईतल्या सिडकोच्या घरांपेक्षा मुंबईतील ‘म्हाडा’च्या सदनिकांना त्याकाळी चांगली मागणी होती. आज परिस्थिती अशी आहे की सिडकोच्या सदनिकांना अनेक जण भरभरून प्रतिसाद देत आहेत.

प्रारंभीच्या काळात सिडकोने बांधलेल्या घरांची रचना आणि दर्जा हा आजच्या इतका सुधारलेला नव्हता; पण सिडकोने बांधलेल्या काही संस्था पुरेशा जागेत आणि ऐसपैस बांधण्यात आल्या होत्या. घरातील मोकळ्या जागांचा खुबीने वापर करण्याचे तंत्र सिडकोने या इमारत बांधणीच्या काळात वापरले. त्यामानाने खासगी सहकारी गृहनिर्माण संस्थाही तितक्या पुढारलेल्या नव्हत्या. भरपूर जागा आणि मैदाने अशी रचना असलेल्या काही संकुलामध्ये आज स्वयंशिस्त आणि स्वच्छता कायम आहे. ऐरोली सेक्टर- ५ मधील ‘शांतिदूत अपार्टमेंट सोसायटी’ने हा स्वच्छतेचा वारसा जपलेला आहे. संकुलामध्ये शांतता आणि प्रसन्न वातावरण ही ‘शांतिदूत’ची खासियत. स्वच्छता हा प्राधान्याने राबवलेला उपक्रमच म्हणावा इतकी काळजी येथील रहिवाशी घेतात. संकुलात आजवर स्वच्छता असल्याने आरोग्यही कायम नांदत असल्याचे येथील सदस्य आवर्जुन सांगतात. मैदान ही निकड संकुलाने जाणली आणि त्यासाठी संकुलाच्या वतीने मोकळ्या जागेत उद्यान तयार न करता मातीचा भराव टाकून मैदान बनवले. संकुलात विशेष करून मातीतले खेळ खेळले जातात. शरीराला मातीचा फायदा होतो. त्यासाठी मातीचे मैदान तयार करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे संकुलातील प्रत्येक रहिवाशांकडून सुका आणि ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते.

ऐरोली रेल्वे स्थानकापासून दहा मिनिटांच्या अंतरावर हे संकुल आहे. सिडकोच्या १९८५ मध्ये काढलेल्या घरांच्या सोडतीत ही घरे मिळाली. दोन वर्षांनंतर सिडकोने ही इमारत रहिवाशांच्या ताब्यात दिली. ‘शांतिदूत’मध्ये चार मजली आठ इमारती आहेत. त्यात १२८ सदनिका आहेत. मध्यंतरी या इमारतीला ‘एफएसआय’ वाढवून देण्यात आला. दोन वर्षांपूर्वी संकुलाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. दर सहा वर्षांनी संकुलाला रंगरंगोटी केली जाते. प्रत्येक इमारतीच्या वर पत्र्यांचे छप्पर उभारण्यात आले आहे. याशिवाय संकुलात कोजागिरी, होळी, स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. दर २६ जानेवारीला सत्यनारायणाची पूजा घालण्यात येते. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमात महिला आणि मुलांच्या स्पर्धागुणांना वाव दिला जातो. स्वच्छता हा शांतिदूत संकुलाचा लौकिक आहे. संकुलात नियमित कीटकनाशक फवारणी करण्यात येते. ‘स्वच्छ नवी मुंबई, हरित नवी मुंबई’ हे ब्रीद कायम ठेवत संकुलात अशोका, नारळ, बदाम आणि उंबर आदी झाडे लावण्यात आली आहेत. सोसायटीमध्ये पाण्याची सुविधा उत्तम असून इमारतीच्या वर आणि भूमिगत टाक्या आहेत. दर सहा महिन्यांनी त्यांची स्वच्छता केली जाते. संकुलातील प्रत्येक रहिवाशांकडून सुका आणि ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. संकुलात मोकळ्या जागेत नाममात्र शुल्क आकारून वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आल्याचे ‘शांतिदूत’चे सचिव राहुल भोईटे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shantidoot apartment in sector 5 airoli

ताज्या बातम्या