आगरी साहित्य विकास मंडळाचे १४ वे राज्यस्तरीय आगरी साहित्य संमेलन शनिवार व रविवार असे दोन दिवस उरण तालुक्यातील नवीन शेवे या गावी आयोजित करण्यात आले आहे. राज्यस्तरीय साहित्य संमेलनात आगरी तसेच इतर भाषेतील ज्येष्ठ साहित्यिकही हजेरी लावणार आहेत.
संमेलनाचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री लीलाधर डाके यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आगरी साहित्य, संस्कृती तसेच इतिहास याची माहिती देणारे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. या दोन दिवसांत आगरी साहित्यिकांसाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार मनोहर भोईर यांनी दिली. साहित्य संमेलन आगरी साहित्यिक प्रा.व्यंकटेश म्हात्रे साहित्यनगरी (नवीन शेवे) येथे भरणार आहे.
यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर,बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, भिंवडीचे आमदार रूपेश म्हात्रे तसेच माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार सुरेश टावरे, दशरथ पाटील व अ‍ॅड.पी.सी.पाटील यांच्यासह कवी अशोक नायगावकर,अरुण म्हात्रे, विवेक मेहेत्रे, मंगेश विश्वासराव, संजीवन म्हात्रे, अभिनेता मयुरेश कोटकर आदीजण उपस्थित राहणार आहेत. शनिवारी दुपारी ३ वाजता ग्रंथदिंडीने व चित्र प्रदर्शनाने संमेलनाला सुरुवात होईल. यावेळी आगरी भाषेतील स्वागतगीताने उपस्थितांचे स्वागत करण्यात येणार आहे. संमेलनात कविसंमेलन आगरफुला, तर गावची जत्रा भानगडी सत्रा या मोहन भोईरलिखित नाटकाचा प्रयोग, रविवारी २८ फेब्रुवारीला महाराष्ट्रातील विविध बोलींचे प्रमाण, मराठीतील योगदान व संवर्धनाची गरज, उपाय या विषयावर परिसंवाद होणार आहे.
त्याचप्रमाणे आगरी समाजाचा इतिहास कल्पना आणि वास्तव या विषयावर दुसरा परिसंवाद होणार आहे. मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांची मुलाखत तर त्याच्याच जोडीला मराठी भाषा परिसंवाद व खुले कवी संमेलन, आगरी नृत्य कला आदी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.