संपर्क करूनही ‘१०८’ सरकारी रुग्णवाहिकेकडून प्रतिसाद नाही

पनवेल : खारघर येथील पाच विद्यार्थी खारघरच्या डोंगररांगांवर मंगळवारी सकाळी सव्वासात वाजता गिर्यारोहणासाठी  गेले होते. परंतु यातील एका विद्यार्थ्यांचा तोल निसटल्याने तो ५० फूट डोंगरदरीत पडला. जेथे ही घटना घडली त्यापासून किलोमीटर अंतरावर गोल्फकोर्सच्या शेजारील रस्त्यावर हॉलीबॉल खेळणारे, झाडांना पाणी देणारे, तसेच व्यायामासाठी आलेल्या नागरिकांनी धाव घेऊन रक्तबंबाळ झालेल्या दिग्विजय शिंदे या विद्यार्थ्यांला रुग्णालयापर्यंत उपचारांसाठी नेले. या घटनेने गिर्यारोहणाला जाताना जरा जपूनच असा इशारा दिला आहे.

खारघर वसाहतीमधील सेक्टर २० येथे राहणाऱ्या पाच मुलांना नुकताच दहावी इयत्तेत प्रवेश मिळाला आहे. दररोज फूटबॉल खेळण्यासाठी घराबाहेर जाणाऱ्या या विद्यार्थ्यांनी आज गिर्यारोहणासाठी जातोय असे घरी कळविले होते. दिग्विजय हा त्यापैकी एक होता. सकाळी सव्वा सात वाजता त्यांनी पांडवकडा यामधील डोंगरावर चढाईस सुरुवात केली. गिर्यारोहणासाठी डोंगरावर गेलेल्या मुलांनी अर्ध्या तासात अर्धा डोंगर पार केला होता.  याच दरम्यान डोंगरावर काही तरी घडल्याचे येथे हॉलीबॉल खेळणाऱ्यांना जाणवले. परंतु नेमकी काय हालचाल झाली हे समजले नाही. अर्ध्या तासाने डोंगरावरील एक मुलगा धापा टाकत हॉलीबॉल खेळणाऱ्या रहिवाशांपर्यंत आला. त्याने त्यांच्यातील एक मित्र ५० फूट खोल डोंगरदरीत पडल्याचे सांगितले. त्यानंतर नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. डोंगराच्या काही भागापर्यंत झाडांना पाणी घालण्यासाठी दुचाकीने पाण्याने भरलेले ड्रम घेऊन जातात. त्याच मार्गाचा अवलंब बचावकार्यासाठी करण्यात आला. बुलेट व दुचाकी घेऊन हॉलीबॉल खेळणारे पोलीस निरीक्षक अर्जुन गरड, बालेश भोजणे, कृष्णा कदम, आनंद बैलकर, रवी नायर, विल्सन, अनुराग गुप्ता, अंकुश कदम, सतीश गायकवाड, सुरेश पटेल, तुषार कोळपे, नितीन कोळपे व इतर नागरिकांनी दिग्विजय पडलेल्या ठिकाणी धाव घेतली. जिथपर्यंत दुचाकी जाणे शक्य होते तेथून पुढील प्रवास पायी प्रवास एकटय़ाने करणे कठीण असताना दिग्विजयला बचावण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. कोणी पोलिसांना फोन लावला, तर कोणी रुग्णवाहिकेला, तर कोणी रुग्णालयाला खाट तयार ठेवायला सांगितली. जखमी दिग्विजयला चालता येत नव्हते, त्यामुळे डोंगरातून गोल्फकोर्सपर्यंत आणण्यासाठी एकाने चादर आणली. आणि सहा जणांच्या बचावपथकाने त्याला उचलून एक किलोमीटर अंतरापर्यंत आणले. तोपर्यंत जखमी दिग्विजयचे वडील आले होते. त्यांचे खारघरमध्ये औषधाचे दुकान आहे. सुरुवातीला दिग्विजयला मिडिसिटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र चिंताजनक प्रकृतीमुळे त्याला अपोलो रुग्णालयात तत्काळ हलविले. त्याच्या डोक्याला, डोळ्यांना, छातीला व चेहऱ्यावर मार लागला आहे. सुमारे ४५ मिनिटे झाल्यानंतर दिग्विजय हा रुग्णालयात पोहचला होता. मात्र अंकुश सनस यांनी १०८ या मदतवाहिनीशी संपर्क साधूनही सरकारी रुग्णवाहिका दिग्विजला मिळू शकली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

गिर्यारोहणाला जाताय तर काय कराल..

* मुले कुठे जाणार याची पालकांना पूर्ण माहिती पाहिजे, पालकांनी त्यांना त्या जागेबद्दलची माहिती दिली पाहिजे. ट्रेकिंग करणाऱ्यांनी त्यांच्या फीटनेसनुसार ट्रेकिंगची लेव्हल ठरविणे गरजेचे आहे.

* ट्रेकिंगमध्ये मानवी चुकांमुळे अनेक अपघात होत असतात, ते टाळण्यासाठी ट्रेकरने अतिउत्साह टाळला पाहिजे. भटकंती करण्यास जाणाऱ्यांसोबत गाईड असणे अत्यावश्यक आहे.

* दिशादर्शक, पुरेसे पाणी, मोबाइल चार्जर-बॅंक, बॅटरी, मजबूत दोरी असे साहित्य ठेवणे गरजेचे आहे, असे पनवेलचे दुर्गमित्र अजय गाडगीळ यांनी सांगितले.