रस्ते सुरक्षा जनजागृती करण्याच्या हेतूने इंडिया बाईक वीक या संस्थेने चाय अ‍ॅण्ड पकोडा ब्रेकफास्ट या अनोख्या बाईक रॅलीचे रविवारी आयोजन केले होते. वाशी येथील सेंटर वन मॉल येथे रविवारी सकाळी पोलीस आयुक्त अरविंद साळवे यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवत चाय अ‍ॅण्ड पकोडा ब्रेकफास्ट रॅलीला सुरुवात झाली. मुंबई पुणे महामार्गावरील ७६ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लोणावळा येथील शीतल ढाब्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली.
यावेळी हायाबुसा, हर्ले डेव्हिडसन, यामाहा, कावासाकी, सुझुकी, बुलेटसारख्या महागडय़ा आकर्षक दुचाकींनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. अनेक जण या रॅलीत उत्साहाने सहभागी झाले होते. या बाईक रॅलीत मुंबई, ठाणे, वसई व पुणे आदी भागांतून बाईकस्वार आले होते. वाशी सेंटर वन मॉल येथून लोणवळा येथील शीतल ढाब्यापर्यंत ७६ किलोमीटरची बाईक रॅली काढण्यात आली. वाशी, पाम बीच मार्गी, उलवे नोड करत पळस्पे येथून जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून या बाईकस्वारांच्या ताफ्याने मार्गक्रमण केले. एक मुख्य रायडर सर्वाच्या पुढे, त्याच्यामागे दोन उपमुख्य रायडर आणि त्याच्या मागे इतर बाईक्सचा ताफा अशा शिस्तबद्धपणे ही रॅली काढण्यात आली.
प्रत्येकी २० ते ३० बायकर्सचा एक ग्रुप करण्यात आला होता. संस्थेच्या माध्यमातून रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आणि इतर वाहनांना त्रास होऊ नये या दृष्टीने सूचना केल्या जात होत्या. लोणावळ्यातील शीतल ढाबा या ठिकाणी चहा आणि पकोडा या न्याहरीचा आस्वाद घेतल्यावर परतीचा प्रवास सुरू झाला.