एप्रिलमध्ये मात्र अडीचशेचा पल्ला गाठणार!
यंदा देशातील डाळीचे कमी उत्पादन आणि साठेबाजी करणाऱ्यांवर सरकारने केलेल्या उपाययोजना यामुळे विविध प्रकारच्या डाळी यावर्षीपेक्षा पुढील वर्षी एप्रिल नंतर आणखी महागणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. ग्राहकांना स्वस्त दरात डाळी मिळाव्यात यासाठी सरकारने कितीही उपाययोजना केल्या असल्या तरी घाऊक बाजारात तूरडाळ आजही १६० रुपये प्रती किलोने विकली जात असल्याने ती किरकोळ बाजारात १८० रुपयांना मिळत आहेत. लातूर, विदर्भ आणि कर्नाटक, मधून सुरु झालेल्या आवकमुळे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात डाळी काही प्रमाणात स्वस्त होणार असल्याचे दिसून येते.
यंदा डाळींनी किंमतीचा उच्चाक गाठला आहे. सहा महिन्यापूर्वी तूरडाळीने दोनशे रुपयांचा पल्ला गाठला होता. त्यामुळे सरकारला साठेबाजीवर कारवाई करुन हा दर कमी करण्याचा प्रयत्न करावा लागला मात्र तो अपयशी ठरला असून कमी उत्पन्नामुळे तूर व उडीद डाळ घाऊक बाजारातच दीडशे रुपयांपेक्षा कमी होऊ शकली नाही. यंदा सरकारने साठेबाजांवर कारवाई करताना हजारो टन डाळ जप्त केली. सरकारने कितीही उपाययोजना केल्या तरी आजही घाऊक बाजारात तूरडाळ १०५ ते १६२ रुपये किलो व उडीद डाळ १३५ ते १५८ रुपये किलोने विकली जात आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात हा दर १८० ते २०० रुपये किलो आहे. कमी उत्पन्न व परदेशी डाळींची वेळीच न झालेली आवक यामुळे यंदा डाळींचे दर दोनशे रुपयांपर्यंत गेले पण नवीन वर्षांत हे दर दोनशे रुपयांपेक्षा जास्त होण्याची भिती व्यापारी वर्तळूात व्यक्त केली जात आहे. सध्या लातूर मधील तूरडाळीची आवक सुरु झाली असून पुढील एक महिन्यात विदर्भ व कर्नाटकमधील डाळ येण्यास सुरुवात होणार आहे. ही आवक एकदम वाढणार असल्याने केवळ जानेवारी फेब्रुवारी महिन्यात तूर डाळ स्वस्त होण्याची शक्यता आहे. घाऊक बाजारात आज १६२ रुपये प्रती किलो असलेली आजच्या डाळीच्या किमतीत १० ते १२ रुपयांनी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र हा साठा संपल्यानंतर एप्रिल महिन्यात डाळीचा खूप मोठय़ा प्रमाणात तुटवडा जाणवणार असल्याने तिचा दर २५० रुपये प्रती किलो जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

देशातील डाळींचे कमी उत्पादन, परदेशी डाळींची वेळीच न नोंदवलेली मागणी यामुळे यंदा डाळी दोनशे रुपयांपर्यंत महागल्या. पण सरकारने घाऊक व्यापाऱ्यांवर ठेवलेली करडी नजर, दंड यामुळे व्यापारी साठे करण्यास तयार नाहीत. माझ्याकडे आज केवळ १५ क्विंटल डाळ आहे. साठे केले जाणार नसल्याने पुढील वर्षी डाळ दोनशे रुपयांपेक्षा जास्त दराने विकली जाण्याची शक्यता आहे.
– आयुष मेहता, डाळ व्यापारी, एपीएमसी