नवी मुंबईतील उमेदवारांच्या खुबी आणि त्रुटींवरही बोट; म्हात्रे, नाईक सर्वाधिक लक्ष्य

शनिवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर समाजमाध्यमांवर मात्र प्रचार सुरूच होता.  त्यामुळे अनेक समूहप्रमुखांनी राजकीय प्रचाराच्या ‘पोस्ट’मधून अंग काढून घेतल्याचे दिसून येत होते, मात्र मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत समाजमाध्यमांवर अप्रत्यक्ष प्रचार केला जात होता. त्या विरोधात कोणी तक्रार केली नसल्याने प्रचार बिनबोभाट सुरू होता. त्यात उमेदवारांच्या खुबी वा त्रुटी व्यक्त करणारा मजकूर टाकला जात होता.

सोमवारी राज्यात एकाचवेळी २८८ मतदार संघासाठी मतदान झाले. सकाळी सात वाजल्यापासून सुरु झालेल्या या मतदानात दुपारनंतर छुप्या पध्दतीने व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर प्रचार केला जात होता. त्यासाठी उमेदवारांच्या एखाद्या घटनेचा उल्लेख करून अशा उमेदवारांना मतदान करणार का, असे सवाल उपस्थित केले जात होते. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे या फटकळ बोलण्यात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या गुणाचा अपप्रचार ऐनवेळी केला जात होता. अशा उमेदवाराला मतदान करणार का, असे सवाल उपस्थित करुन संदेश फिरवले जात होते. म्हात्रे यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे अशोक गावडे आणि मनसेचे गजानन काळे हे दोन उमेदवार आहेत. त्यामुळे हे संदेश त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पसरवले जात असल्याचे दिसून येते. हाच प्रकार ऐरोली मतदारसंघात सुरू होता. ऐनवेळी पक्ष बदलणाऱ्या उमेदवाराला मतदान करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

म्हात्रे व नाईक यांच्याविरोधात प्रचार

भाजप-शिवसेना महायुतीचे उमेगवार गणेश नाईक हे या मतदारसंघात उमेदवार आहेत. त्यांनी निवडणूकीच्या एक महिना अगोदर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात हा प्रचार शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होता. नाईक यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे गणेश शिंदे हे उमेदवार आहेत. मनसेचे नीलेश बाणखेले हे रिंगणात आहेत. नाईक वा म्हात्रे यांच्याविरोधात प्रचार करणारे हे महाआघाडी वा मनसे सर्मथक असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.