नवी मुंबई : नवी मुंबई गुन्हे शाखेने वाहन चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली असून त्यांच्याकडून १२ गुन्हे उकल केले आहेत. आरोपींकडून ५४ लाख रुपयांच्या ९ कार जप्त करण्यात आल्या आहेत.
तीन आरोपींना अटक केले असून एक फरार आहे. हे चोरटे पटकन विक्री आणि चोरण्यास सोपी म्हणून मारुतीची इको ही कार चोरी करत असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी दिली.
उस्मान सय्यद, शहनवाज शेख, अब्दुल शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील उस्मान व सय्यद यांना आठवडाभर पाठलाग करीत कुर्ला व पनवेल येथून अटक करण्यात आली तर त्यांनी दिलेल्या माहितीवरून तीन दिवस पाठलाग करीत अब्दुल याला कुर्ला जरीमरी झोपडपट्टीतून अटक केली आहे.
कोपरखैरणे परिसरातून २०२१ मध्ये इको कार चोरीस गेल्या होत्या. त्यानुसार घटनास्थळीवरील सीसीटीव्ही चित्रण व तांत्रिक तपास सुरू होता. दोन पथके तपास करीत होती. ऐरोली पथकर नाका द्रुतगती मार्ग विक्रोळी, घाटकोपर, कामराजनगर, सांताक्रूझ, चेंबूर- जोडरस्ता, कुर्ला, बीकेसी असा तपास सुरू असताना एका ठिकाणी आरोपीने मोबाइलवर पथकर भरल्याने त्याचा मोबाइल क्रमांक मिळाला होता. त्याचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींनी एकमेकांशी साधलेले संवाद याद्वारे या चोरटय़ांची माहिती समोर आली. चार चोरटे मिळून वाहन चोरी करीत होते. त्यापैकी एक आरोपी ओला कॅब चालक होता. मिळालेल्या माहितीवरून आरोपींचा शोध सुरू होता. पोलीस निरीक्षक सुनील शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक नीलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके हा तपास करीत होती. यातील सुनील शिंदे यांच्या पथकाने आरोपी उस्मान व शहनवाज शेख यांना सतत पाच ते सहा दिवस पाठलाग करीत कुर्ला व पनवेल परिसरातून त्यांना शिताफीने अटक केली. तसेच नीलेश पाटील यांच्या पथकाने तीन ते चार दिवस सलग पाठलाग करीत आरोपी अब्दुल याला जरीमरी झोपडपट्टी येथे अटक केली.
आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. चोरी केलेली वाहने तमिळनाडूतील विविध भागांत दहा दिवस तपास करीत चोरीची ९ वाहने जप्त केली. यात नवी मुंबईतील चार, मुंबईतून चोरी झालेली सहा व ठाणे शहरातून चोरीचे दोन असे एकूण १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
बनावट चावीद्वारे चोरी
आरोपी अब्दुल सलाम शेख व फरार आरोपी रहिम खान हे चोरी करण्यासाठी मारुती इको कारची टेहळणी करीत. कारचे इंधन लॉक काढून त्याद्वारे बनावट चावीद्वारे कार चोरी करून तिच्या नंबर प्लेटमध्ये बदल करीत. ओळखीच्या खुणा नष्ट करीत असे. त्यानंतर आरोपी उस्मान सय्यद व शहनवाज शेख चोरलेली कार तमिळनाडू राज्यात नेऊन तेथील ओळखीच्या कार विक्री करणाऱ्या मध्यस्थांच्या मदतीने या कार विकत असे.
चोरटय़ाकडून २३ मोबाइल जप्त
नवी मुंबई : घणसोली येथील भाग्यलक्ष्मी मोबाइल शॉपीचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून चोरीचे एक लाख १० हजारांचे २३ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. ९ मार्च रोजी अपरात्री दुकानातून २३ मोबाइल चोरी करण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास करीत असताना साहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या पथकाला दोन संशयित रबाळे तलावाजवळ असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर देवडे यांच्या पथकाने आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुलीही दिली. त्यातील मयूर याला अटक केले असून दुसरा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.