पनवेल : खारघर परिसरात गेल्या सात दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत नाही. केवळ अर्धा तास नळाला पाणी येत आहे. याबाबत तक्रार केल्यानंतर लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगितले जाते. मात्र ही समस्या सुटत नाही. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत.

अर्धा तासही पाणी नळाला येत नाही, वारंवार हात धुवायचे कसे? असे प्रश्न खारघर वसाहतीतील नागरिक समाजमाध्यमांवर विचारत आहेत.

खारघरवासीयांचा उन्हाळ्यातील पाणीप्रश्न आजही कायम आहे. पाण्यासाठी अनेक आंदोलने केली, तरीही प्रश्न सुटत नाही. खारघर वसाहतीप्रमाणे कळंबोली वसाहतीमध्ये  पाण्याचा कमी दाबाने पुरवठा सुरू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे पाणी येत नसल्याचे संदेश नागरिकांच्या मोबाइलवर येतात. मात्र संदेशानंतर दोन दिवस पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी लागतो. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची अधिक मागणी असताना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एमजेपीची आसूडगाव येथे फुटलेल्या जलवाहिनीमुळे शीव-पनवेल महामार्गावर दररोज प्रवाशांना पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसते, मात्र प्रत्यक्षात वसाहतीत पाणीपुरवठा होत नाही.  गेल्या सात दिवसांपासून पाणी नाही. अक्षय्य तृतीयाला नागरिकांनी विनाआंघोळीने राहावे का, असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे. सिडकोच्या कनिष्ठांपासून वरिष्ठांपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना संपर्क केला, पण अधिकारी प्रतिसाद देत नसल्याचा आरोपीही करण्यात येत आहे.

आमच्या सोसायटीने जलवाहिनी तपासणी, दुरुस्ती सर्व उपाययोजना सिडकोच्या सांगण्याप्रमाणे केल्या आहेत, तरीही पाणीपुरवठा होत नाही. आपल्या सोसायटीकडे जास्त पाणी यावे म्हणून अनेकांनी बुस्टरपंप लावले आहेत. यावरही कोणाचे नियंत्रण नाही. सेक्टर २१ मध्ये आम्ही राहत असलेल्या इमारतीमध्ये अवघे ८ सदनिकांना सिडकोचे पाणी पुरत नाही. याच्यासारखे महामुंबईचे दुर्भाग्य नाही.

-रितू मेंगळुरकर शर्मा, रहिवासी, खारघर