उरणमधील जेएनपीटी कामगार वसाहतीत दोन महिन्यांपासून अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने येथील हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. व्यवस्थापनाकडून महिन्याला लाखो रुपयांची देयके देऊनही पाणीपुरवठा होत नसल्याने टँकरचे पाणी वापरावे लागत असल्याने महिलावर्ग संतप्त आहे.
जेएनपीटी बंदरातील कामगारांसाठी अडीचशेपेक्षा अधिक इमारतींची वसाहत उभारण्यात आलेली आहे. या वसाहतीला सध्या सिडकोच्या हेटवणे योजनेतून पाणीपुरवठा केला जात आहे. कामगार वसाहतीला पाणीपुरवठा करणारे पंप नादुरुस्त झाल्याने काही दिवसांपूर्वी आठवडाभर पाणी नव्हते. मात्र सिडकोने हे पंप दुरुस्त केल्यानंतर जलवाहिनी फुटल्याने सध्या पाणीपुरवठा बंद झाला आहे. कामगार वसाहतीत पाणी येत नसल्याने बंदरातील अनेक स्थानिक कामगारांचे कुटुंबीय गावातील घरांकडे जाऊ लागले आहेत. उरणमधील सर्व सुविधांनी युक्त असा या वसाहतीचा लौकिक आहे. या कामगार वसाहतीत सध्या बंदरावर आधारित उद्योगातील अधिकारी तसेच कामगार-कर्मचाऱ्यांसह राज्य व केंद्र सरकारच्या आस्थापनामध्ये कार्यरत कर्मचारीही वास्तव्य करीत आहेत. या पाणीटंचाई संदर्भातील प्रतिक्रियेसाठी जेएनपीटीचे सचिव व वरिष्ठ व्यवस्थापक डी. नरेश कुमार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.