नवी मुंबई : शहरात प्लास्टिकचा वापर सर्रास सुरू आहे. त्यात महापालिकेच्या पथकाकडून होत असलेली कारवाई थांबली असल्याने १ जुलैपासून पूर्णपणे लागू केलेली बंदी यशस्वी होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनाने २०१८ मध्ये प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला होता. पण कठोर अंमलबजावणीअभावी हा निर्णय पूर्णत: फसरल्याचे चित्र सर्वत्र आहे. प्लास्टिक बंदी करताना त्याला पर्याय शोधण्यात सरकारदेखील अपयशी ठरत आहे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ जुलैपासून ही बंदी लागू होणार आहे. मात्र राज्य सरकारची प्लास्टिक बंदी फसलेली असताना केंद्राच्या या नव्या बंदीचे काय होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी असताना बाजारात मात्र या पिशव्यांचा वापर पाहायला मिळतो. करोनाकाळात प्लास्टिकचा वापर वाढला आहे तो आही कायम आहे. व्यापारी संकुले, एपीएमसी मार्केट, किराणा दुकानदार, खाद्यविक्रेते तसेच मांस विक्रेत्यांसह इतर बाजारपेठांमध्ये बंदी असलेल्या पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे.
बंदीची घोषणा झाली. तेव्हा पालिकेनेही जोरदार कारवाईला सुरुवात केली होती. आता पुन्हा एकदा प्लास्टिकचा वापर सुरू झाला आहे. याबाबत पालिकेने कारवाईबाबत लक्ष देण्याची आवश्यकता आहे. याबाबत पालिका विभाग अधिकारी व मुख्यालय स्तरावरून
कारवाईची आवश्यकता आहे. याबाबत महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांना विचारले असता शहरात कारवाई सुरू असल्याचे सांगितले.