पाऊसपाणी मनाजोगे होऊन भुईमधून तरारून आलेली पिके डोलू लागली, की दक्ष शेतकरी योग्य वेळी जंतुनाशकांची फवारणी का बरे करतो? उत्तर अगदी सोपे आहे : पिकांवर किडींचा घाला पडू नये म्हणून. औषधफवारणी झाली की किडींचा अथवा रोगजंतूंचा संसर्ग पिकाला होणार नाही, किंबहुना रोपांच्या परिसरात त्यांचा वावर मुळातच रोखला जाईल, याची शेतकऱ्याला हमी असते. आपलीही अवस्था फारशी वेगळी नसते. भेदाच्या गराडय़ामध्येच अखंड व्यवहार करत राहायचे, परंतु द्वैताच्या संसर्गापासून अंत:करण अस्पर्शित राखायचे, ही कमालीची कठीण बाब. त्याचे कारणही सोपे आहे. आत्मकेंद्रितता हा तर आपला स्थायीभाव! ‘स्व’ची जाणीव जीवनाच्या अगदी पहिल्या श्वासापासून आपल्या अस्तित्वाला चिकटलेली असते. तेही पुन्हा स्वाभाविकच. ‘‘उठे विकार ब्रह्मी मूळ’’ असा आमच्या मुक्ताबाईंचा या संदर्भातील दाखला विचक्षण आहे. ‘विकार’ या संज्ञेला इथे विशिष्ट अर्थ आहे. ‘रोग’ वा ‘आजार’ हा ‘विकार’ या शब्दाचा व्यवहारातील अर्थ इथे घ्यायचा नाही. कोणत्याही अस्तित्वामध्ये निसर्गत:च जे बदल घडून येतात, त्यांना ‘विकार’ असे संबोधले जाते. पाण्यावर लहरी जितक्या स्वाभाविकपणे उठतात, तितक्या सहजतेने ‘मी’चा अंकुर बहरतो. द्वैताचे खतपाणी त्याला मग यथावकाश मिळत राहते. ‘मी’च्या विस्मरणात जगण्याचा परिचयच आपल्याला नसतो. किंबहुना, ‘स्व’रहित जगण्याची साधी कल्पनाही आपण करू शकत नाही, असे जे. कृष्णमूर्ती सतत म्हणायचे. ‘स्व’ हाच आपला स्थायीभाव असल्याने त्याच्या सापेक्ष असणारा ‘पर’ हा ठेवलेलाच असतो. ‘स्व’ आणि ‘पर’ या द्वंद्वानेच आपले जगणे अहोरात्र व्यापलेले आहे. या दोहोंचे विसर्जन झालेल्या निर्द्वद्व जगण्याची लज्जत आपण उमरभर चाखतच नाही, याचीही खंत कृष्णमूर्ती सतत मुखर करत राहिले. ‘आप-पर’ भावनेने आपले मन विटाळू न देणे ही खरोखरच दुर्घट परीक्षा. या परीक्षेमधून तरून जायचे तर त्यासाठी साधनही तितकेच समर्थ हवे. नामचिंतन हे ते साधन. ‘‘नाम तारक हे थोर। नामें तरले अपार।’’ असा स्वानुभव सेनामहाराजांनी नि:संदिग्धपणे नोंदवून ठेवलेला आहे. संतमंडळाने नामचिंतनरूपी साधनाचा अंगीकार हिरीरीने पुरस्कारण्यामागील गमक हेच! भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या भक्तिसाधनेची दोन मुख्य अंगे होत. त्यांतील पहिले म्हणजे नामस्मरण आणि दुसरे म्हणजे लोकसंग्रह. नामाचे संतमंडळाला भावलेले हे महत्त्व आपल्याला बहुतेक वेळा उमगतच नाही. या संदर्भात ‘हरिपाठा’त ज्ञानदेवांनी दिलेला दाखला बेलाग आहे. ‘‘एक नाम हरि द्वैत नाम दुरी’’ असे ज्ञानदेवांचे या संदर्भातील मोठे मार्मिक उद्गार आहेत. मुखामध्ये एकदा का नाम धारण केले की द्वैत जवळपासही फिरकत नाही, असा ज्ञानदेवांचा निखळ सांगावा. जंतुनाशके ज्याप्रमाणे पिकांना किडींपासून संरक्षक कवच पुरवितात त्याच न्यायाने, मुखरूपी द्वारावर नामाचा पहारा सिद्ध केला की द्वैतरूपी जंतूचा अंत:करणात प्रवेश संभवतच नाही, असे आणि इतके ज्ञानदेवांचे हे सांगणे तर्कशुद्ध होय. नामचिंतन नेमके कशासाठी करावयाचे याचा उलगडा आता सहजपणे व्हावा!
– अभय टिळक
agtilak@gmail.com