कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक अॅलन टुरिंग यांनी १९५० मध्ये आपल्या लेखात कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेशी समतुल्य आहे अथवा नाही हे ओळखण्यासाठी एक सोपी चाचणी दिली होती. त्या चाचणीनुसार बंदिस्त खोलीतल्या यंत्र व मानव यांना आपण खोलीबाहेरून प्रश्न विचारले आणि मिळालेली उत्तरे कोणी दिली हे प्रश्नकर्त्याला ओळखता आले नाही तर ते यंत्र माणसाइतके बुद्धिमान समजण्यात यावे. ही कसोटी उत्तीर्ण होण्यासाठी यंत्रापाशी प्रश्नाचे उत्तर शोधण्याची बुद्धिमत्ता असणे पुरेसे नाही तर, मानवी भाषेतला प्रश्न समजायचे आणि मानवी भाषेत उत्तर देण्याचेही कौशल्य असणे गरजेचे आहे. या मानवी भाषा समजण्याच्या तंत्रज्ञानाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात ‘नैसर्गिक भाषा प्रक्रिया’ (नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग), असे म्हणतात. विसाव्या शतकाच्या पूर्वर्धात यंत्रांचे भाषापटुत्व हे फक्त विज्ञानकथांमध्ये शक्य होते. आज मात्र सिरी, अलेक्सासारखे यंत्र साहाय्यक व चॅटबॉट्स अशा मानवी भाषा समजून घेणाऱ्या यंत्रांशी आपण रोज संवाद करू लागलो आहोत. नैसर्गिक भाषा प्रक्रियेचा हा प्रवास, त्यातले असंख्य अडथळे, त्यावर शोधलेले तोडगे, त्यांचे फायदे याबद्दल जाणून घेणे नक्कीच मनोरंजक आहे.

हेही वाचा >>> कुतूहल :  जेम्स लाइटहिल

१९५० च्या दशकात संगणक शास्त्रज्ञ व भाषातज्ज्ञ यांनी यंत्राला भाषा शिकवण्यासाठी प्रारूपे ( मॉडेल्स) बनवण्याचे प्रयत्न सुरू केले. १९६०-७० च्या दशकामध्ये काही पूर्व निर्धारित नियमानुसार काम करणारी प्रारूपे बनवण्यात आली. ठरावीक नियम वापरून यात वाक्यांचे विश्लेषण केले जात असे. १९८०-९० दरम्यान संख्याशास्त्रावर आधारित प्रारूपे अस्तित्वात आली. ही प्रारूपे दिलेल्या माहितीचा व संभाव्यतेचा वापर करून वाक्यांचे विश्लेषण करू शकत होती. माहिती व पूर्व अनुभवातून स्वयंशिक्षण घेण्याचे व प्रणालीत सुधारणा घडवण्याचे तंत्र (मशीन लर्निंग) या प्रारूपांत वापरले गेले होते. स्वयंशिक्षणासाठी या प्रारूपांना प्रचंड मोठ्या प्रमाणात माहिती पुरवावी लागते. ही प्रारूपे अधिक चांगले व संवेदनाक्षम विश्लेषण करू शकत होती.

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला भाषा प्रक्रियेसाठी यंत्रांच्या सखोल शिक्षणाचे (डीप लर्निंग) व मानवी मेंदूतील कार्यपद्धतीशी साधर्म्य असणारे न्यूरल नेटवर्कचे तंत्रज्ञान वापरात आणले गेले. या तंत्रज्ञानामुळे भाषा आकलनात खूपच मोठी प्रगती शक्य झाली. आता ट्रान्सफॉर्मर व लार्ज लॅंग्वेज मॉडेल्स वापरून ‘चॅट जीपीटी’ सारखी चक्क कविता वा लेख लिहू शकणारी प्रारूपेही अस्तित्वात आली आहेत. अशा प्रकारे यंत्रांच्या भाषापटुत्वाचा आलेख सतत उंचावतच राहिला आहे.

–  प्रा. माणिक टेंबे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org