जगाच्या पाठीवर सर्व लहान-मोठय़ा देशांची संख्या तशी २४९ भरते. पण काही अगदीच चिल्लर आहेत. गावात मुरलेल्या मुरब्बी पाटलाने स्वत:ला राजे म्हणावे आणि आपल्या पाटिलकीला ‘राज्य’, अशा प्रकारे या २४९ च्या संख्येत असे नामधारी देश ३०-३२ तरी असावेत. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी म्हणजेच युनोने प्रमाणित केलेल्या देशांनाच ‘देश’ म्हणून मान्यता दिली जाते.

आजतागायत संयुक्त राष्ट्रांनी १९३ देशांना संपूर्ण मान्यता देऊन संयुक्त राष्ट्रे संघटनेचे सदस्यत्व दिले आहे. याशिवाय कॅथलिक ख्रिस्तींचे प्रमुख धर्मगुरू पोप यांचे प्रशासन असलेला ‘होली सी’ (व्हॅटिकन) हा छोटा देश आणि मध्यपूर्वेतील ‘पॅलेस्टाइन’ या दोन देशांना सदस्यत्व बहाल न करता संयुक्त राष्ट्रे निरीक्षकाची जबाबदारी पार पाडत आहे. या दोन देशांना ‘नॉन-मेम्बर ऑब्झव्‍‌र्हर स्टेट्स’ असे म्हणतात.

तसेच न्यूझीलंडच्या शेजारी असलेले ‘कुक आयलंड्स’ आणि ‘न्योए’ हे छोटे देशसुद्धा संयुक्त राष्ट्रांच्या मान्यतेत नाहीत. तैवानसारखे काही छोटे देश- त्यांच्या भूप्रदेशावर त्यांचे स्वत:चे सार्वभौम सरकार असूनही संयुक्त राष्ट्रांनी त्यांना सदस्यत्व दिलेले नाही. कारण चीन म्हणजेच ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’बरोबर तैवानचा सुरू असलेला संघर्ष. संयुक्त राष्ट्रे तैवानला चीनचाच एक भाग समजते.

याशिवाय स्वत:चे अंशत: स्थानिक स्वायत्त सरकार असूनही काही बाबतींत मात्र दुसऱ्या देशांवर अवलंबून असलेले काही छोटेखानी देशही जगाच्या पाठीवर आहेत. त्यांना इंग्रजीत ‘डिपेन्डन्सीज्’ असे म्हणतात. एस्टोनिया, लॅटिव्हिया आणि लिथुएनिया हे तीन संयुक्त राष्ट्रांकडून मान्यताप्राप्त देश आहेत; दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात या देशांनी सोव्हिएत रशियाकडून झगडून स्वातंत्र्य मिळवले होते. पुढे संयुक्त राष्ट्रांनी या तीन देशांना आपले सदस्य करून घेतले तरी, रशियन सरकारने मात्र या देशांच्या स्वातंत्र्यावर, सार्वभौमत्वावर अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही. अमेरिकेने मात्र वेळोवेळी या तीन नवराष्ट्रांना पाठिंबाच दर्शवला आहे. संयुक्त राष्ट्रांची स्थापना १९४५ साली झाली. त्या वर्षी या संघटनेचे एकूण ५१ सदस्य देश होते.

– सुनीत पोतनीस