प्रा. दत्तात्रेय बाळकृष्ण लिमये (१८८७-१९७१) यांनी १९११ साली पुण्याच्या फग्र्युसन महाविद्यालयात अभ्यास करून मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने एमए केले. त्यामुळे मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात त्यांना प्राचार्य शार्प यांनी प्राध्यापक पद देऊ केले होते. पण इंग्रज सरकारची नोकरी न स्वीकारण्याच्या त्या काळात त्यांनी ती नोकरी न स्वीकारता पुण्याला नव्याने निघालेल्या रानडे इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड इकनॉमिक इन्स्टिटय़ूटमध्ये नोकरी पत्करली. येथे खनिजांचे पृथक्करण, सिमेंटची परीक्षणे होत. महाराष्ट्रभर फिरून तरवड वनस्पती गोळा करून त्यापासून त्यांनी कातडी कमविण्यासाठी लागणारे टॅनिन बनवून दिले. करंजाच्या तेलामधून त्यांनी करंजिन हा स्फटिकी पदार्थ मिळवला. फांगळा वनस्पतीवर संशोधन करून त्यातून त्यांनी कापरासारखा पदार्थ शोधून काढला. फ्लॅव्होनॉइड या वर्गात येणाऱ्या पदार्थाचे संशोधन त्यांनी केले. त्यांच्या हाताखाली एकावन्न विद्यार्थ्यांना संशोधन करून एम.एस्सी. आणि चौघांना पीएच.डी. पदव्या मिळाल्या. त्यांनी फ्यूरोकुमारिन या रसायनाचे सिंथेसिस केले, ते नोबेल पारितोषिक विजेते प्रा. पाउल कारर यांनाही जमले नव्हते. पुढे त्यावरचा त्यांचा निबंध ‘बेरिष्टे’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाला. त्यांनी एकूण ६२ निबंध लिहिले. ‘रसायनम’ नावाचे एक नियतकालिक त्यांनी सुरू केले होते आणि त्यात संशोधन निबंध छापून येत.प्रा. द. बा. लिमये यांनी १९०८ साली खाजगीरीत्या सुरू केलेल्या बाळकृष्ण रसायनशाळेत ते हायड्रोल्कोरिक व नायट्रिक आम्ल, लिकर अमोनिया, कॉपर ऑक्साइड, फॉस्फरस ट्रायक्लोराइड वगरे पंचवीस रसायने बनवत. त्यांची घनता मोजण्यासाठी त्यांनी स्वत: हायड्रोमीटर बनवले होते. पुण्यातील लोक बॅटरीमध्ये घालण्यासाठी विरल केलेले सल्फ्युरिक आम्ल विकत घेत. काचेवर पारा चढवण्यासाठी लागणारे डिस्टिल्ड वॉटर या प्रयोगशाळेत बनविले जाई. पेट्रोलचा गॅस बनवण्याची कृती त्यांनी शोधून काढली होती. प्रा. लिमये यांना प्रयोगशाळेत लागणारी सर्व उपकरणे त्यांनी स्वत:च बनवली होती. त्यात कम्बशन फन्रेस, अ‍ॅल्युमिनियम क्लोराइडची भट्टी, सक्शन फिल्टरेशन साधनेही होती. काचेच्या केशनलिका (कॅपिलरीज) ते कुशलतेने बनवीत.
अ. पां. देशपांडे (मुंबई) , मराठी विज्ञान परिषद,  वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – ढाई अच्छर प्रेम के
ढाई अच्छर प्रेम के पढे सो पंडित होय.. कबीरांनी शेकडो वर्षांपूर्वी ‘प्रेमा’बद्दल हा दोहा लिहून ठेवला आणि लाखो पंडित, पढतमूर्खाची छुट्टी करून टाकली. कबीरजींना प्रेमाचं महत्त्व पटलं, कारण त्यांच्याभोवती पोथीनिष्ठ रूढीपरंपरांनी बरबटलेला समाज होता. राजे महाराजांपासून चिल्लरशाही नोकरचाकरांनी सर्वत्र तिरस्कार, तुच्छता, सूड-भावनांना पेटविलं होतं. आजही त्यापेक्षा खूप वेगळी परिस्थिती नाही.
दुष्टावा आणि अहंगंडानं आत्ताही प्रेमिकांचे बळी पडत आहेत. शिक्षण, संस्कार या समाज परिवर्तनाच्या माध्यमांनी रोजगार दिलाय, पण जर समज आणली ना प्रेमानं एक नातं जोडायला शिकवलं. प्रेमाची इमारत कोणाच्या तरी द्वेषाच्या पायावर उभी केली जाते आहे. त्यामुळे कबीरजी आजही तुमचा ‘दोहा’ तितकाच रिलेवंट आहे.
प्रेम या विषयावर लाखो ग्रंथ, कविता रचलेल्या आहेत, ताज उभारलेले आहेत, पण हे प्रेम या क्या चीज है?
ओशो म्हणतात, प्रेम हे ईश्वराचेच रूप आहे. प्रेमाच्या उद्भवातील उत्कटता आणि आवेग, याचा अनुभव हा माणूस म्हणून  जगण्यातला सर्वोच्च अनुभव आहे. प्रेमाची तीन रूपं आपण अनुभवतो. प्रत्येक व्यक्ती प्रेमाच्या या तीन स्वरूपात उत्क्रांत होते तेव्हा तो क्षण म्हणजे समाधी अवस्था.
प्रेमाची पहिली ओळख अर्थातच आसक्ती. वयात येताना उचंबळून येणारं भिन्नलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण म्हणजे आसक्ती. इथे आपल्याला अनावर ओढ वाटते. लैंगिकतेच्या लाटांवर स्वार होऊन त्या व्यक्तीला भिडावं असं वाटतं. अंगावर उमटणाऱ्या रोमांचांना त्या व्यक्तीच्या स्पर्शानं खुलवावं आणि झोकून द्यावं त्या व्यक्तीच्या पाशात. आसक्ती म्हणजे मनावर प्रभाव टाकणारी ‘काम’भावना. ‘कामातुराणां न भयं, न लज्जा’ अशी भावना. अर्थात या आसक्तीची विद्रूपता भयावह आणि निसरडी असते. तरी आकर्षण वाटणं हा प्रेमाचा अविभाज्य भाग हे विसरून चालणार नाही. प्रेमाची पुढची पायरी ‘प्रीती’. आसक्तीमध्ये सचैल शारीरिकतेची पछाडणारी जाणीव तर प्रीती म्हणजे प्रेमरसात डुंबणारा गुलाबजाम. शरीरापुढे जाणीव होते ती तितकीच उत्कट शृंगाराची आणि मनोमीलनाची. त्या व्यक्तीबद्दल वाटणाऱ्या प्रेमाला समजदारीची आणि परस्पर संमतीची किनार लागते. इथे प्रीती जडते, ओढ वाटते सहवासाची, मतानं एकरूप होण्याची.
प्रीतीचा प्रणयरंग हा वाल्मीकीपासून करण जोहरच्या गोष्टींचा मूळ गाभा असतो. बऱ्याच जणांची गाडी इथे टर्मिनेट होते, अडकते आणि कुंठते.
शरीर आणि मन यांच्या मर्यादा तोडून परस्परांच्या आत्म्याचं मीलन म्हणजे भक्ती. आता समर्पण म्हणजे दो तन एक प्राण. अशी जाणीव. हा भक्तिभाव म्हणजे ईश्वरी रूप.
भक्तीमध्ये तल्लीनता आहे आणि मुक्ती आहे, कारण अहंता गळून पडते, अहंकाराचा लोप होतो. भक्ती हे प्रेमाचं खरंखुरं विशुद्ध रूप..
प्रेमावर बोलावं आणि लिहावं तेवढं थोडंच, त्यामुळे प्रेमाची गोष्ट थेट ‘व्हॅलेंटाइन डे’पर्यंत!!
 डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – खावंदचरणारविंदी मिलिंदायमान
पारतंत्र्यामुळे मानसिक दास्य कसे येते, याचे १३३ वर्षांपूर्वी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी केलेले हे वर्णन आजही लागू पडते.. ‘‘जन्मास येऊन करावें काय, तर परदास्य करावें, यजमानाची खुषामत करावी, लांडय़ालबाडय़ा कराव्या, लोकांच्या मुंडय़ा मुरगाळाव्या, वरिष्ठांची थुंकी झेलून हाताखालच्यांस गांजावें, शेवटीं पैशाची गांठोडी उराशी घट्ट आवळून धरून एकादे दिशीं मरून जावें, – हे एकंदर तत्त्वज्ञान अलीकडे माजले आहें. पूर्वीच्या लोकांत अकिंचन स्थितींत राहणारे, निस्पृह, स्पष्टवक्ते अशा प्रकारचे पुरुष जसे पुष्कळ आढळत असत, तसा प्रकार आतां अगदीं विरळा. आतां हुषार व शहाणा मनुष्य कोण, तर जो साहेबांचे बूट उचलील..  आपल्या यत्किंचित् स्वार्थाकरता किंवा नुसती बहादुरी मिळण्याकरतां जो देशाशीं मात्रागमनीपणा करतांना बिलकुल शरम बाळगणार नाहीं, तो. ’’ मात्र चिपळूणकरांचा इंग्रजी भाषेला वा ज्ञानाला विरोध नव्हता. त्यांचा विरोध दास्यवृत्तीला होता. ते म्हणतात- ‘‘ आमच्या देशात आलीकडे विद्येचा फैलावा थोडा झाला आहे असें नाहीं; पण या विद्येच्या योगानें जें वास्तविक ज्ञान निष्पन्न व्हावें, व जी मनाची थोरवी वाढावी, त्यांतले अजून कांहीच दृष्टीस पडूं लागलें नाहीं असें म्हणावयास हरकत नाही. त्यांतून इंग्रजी विद्या ही तर वस्तुत पाहतां वाघिणीसारखी आहे;  तिच्या दुधावर जो पोसला तो लेंचापेंचा कधींच निपजू नये. उत्साह, धैर्य, अश्लाघ्य कर्माचा तिरस्कार, स्वावलंबन, इत्यादि उदात्त गुण वरील भाषेंतील ग्रंथांच्या अध्ययनापासून उत्पन्न होणारे आहेत. पण आजपर्यंतच्या तऱ्हेवाईक शिक्षणपद्धतीनें म्हणा, अगर तितका संस्कार आमचें ठायीं अद्याप बिंबला नसल्यामुळें म्हणा, वरील गुणांचा उदय अद्याप तर कांहींच झालेला दृष्टीस पडत नाहीं. जिकडे पाहावें तिकड ‘हां जी’, ‘जी हां’, ‘खुदावंत’ , ‘खावंद’ हाच श्ववृत्तीचा प्रकार नजरेस येतो. यकश्चित् मराठी कारकुनापासून तों म्युनिसिपल कमिशनर, कौन्सिलर, दिवाणसाहेब यांच्यापर्यंत एक मासला; – खावंदचरणारविंदी मिलिंदायमान होणारी सारी मिंधी मंडळी!’’